पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी थांबण्याचं नाव घेत नाहीये. ज्येष्ठ नेते मदन मित्र यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता २४ तास उलटत नाहीत तोच, तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रुक्मिणी मल्लिक ऊर्फ कोयल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
कोयल मल्लिक यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असून, तो त्वरित मंजूर करण्याची विनंती केली आहे. “मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून तो तात्काळ स्वीकारण्यात यावा,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर झाली होती पक्षात एन्ट्री
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रणजीत मल्लिक यांच्या कन्या असलेल्या कोयल मल्लिक यांचा बंगालमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. हाच जनाधार मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी एप्रिल २०२६ मध्ये, म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी कोयल यांना राज्यसभेवर पाठवले होते. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कोयल पक्षाच्या प्रचार कार्यात आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये अत्यंत सक्रिय होत्या. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी खासदारकी सोडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

२४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदन मित्रांचे बंड
तृणमूलमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कालच (बुधवारी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन मित्र यांनी ममता बॅनर्जींची साथ सोडत तृणमूलच्याच रिताब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात प्रवेश केला. बंडखोर गटात सामील झाल्यानंतर मदन मित्रांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला.
मित्रा म्हणाले, “मी अभिषेक बॅनर्जी यांना ६ महिने किंवा वर्षासाठी बाजूला होण्याचा सल्ला दिला होता. पक्षाची नौका बुडत आहे, लोक पक्ष सोडत आहेत. अशा स्थितीत इतरांचा बळी गेला तरी चालेल, पण अभिषेक यांना वाचवले पाहिजे, अशी सक्ती पक्षात केली जात आहे, हे अत्यंत वेदनादायी आहे.”
भाजपची सरशी; ‘या’ तीन खासदारांनीही सोडली साथ
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप कडून झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार रिताब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले आहे.
विशेष म्हणजे कोयल मल्लिक यांच्याआधी सुष्मिता देव, प्रकाश चिक बरैक आणि सुखेंदू शेखर राय या तीन तृणमूल खासदारांनीही राज्यसभेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतराच्या काही तासांतच भाजपने या तिन्ही नेत्यांना २४ जुलै रोजी होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत सॉल्ट लेक कार्यालयात या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. या पाठोपाठ आता कोयल मल्लिक यांनीही राजीनामा दिल्याने ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.
