scorecardresearch

‘भारतातले सर्वात मोठे पप्पू’, TMC ने टी-शर्टवर छापला अमित शाह यांचा फोटो, भाजपाने दिलं उत्तर, म्हणाले “लढण्यासाठी…”

तृणमूलकडून अमित शाह यांचा ‘पप्पू’ म्हणून उल्लेख, छापले टी-शर्ट, दुर्गा पुजेला राबवणार मोहीम

‘भारतातले सर्वात मोठे पप्पू’, TMC ने टी-शर्टवर छापला अमित शाह यांचा फोटो, भाजपाने दिलं उत्तर, म्हणाले “लढण्यासाठी…”
तृणमूलकडून अमित शाह यांचा 'पप्पू' म्हणून उल्लेख

तृणमूल काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं असून, टीका करण्यासाठी राजकारणातील पारंपारिक पद्धतीचा वापर केला आहे. तृणमूलने अमित शाह यांच्यावर हल्ला करण्यासाठी टी-शर्ट छापले असून, यावर ‘भारतातील सर्वात मोठे पप्पू’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत अमित शाह यांचं कार्टूनही छापलं आहे.

भाजपा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी नेहमी ‘पप्पू’ या शब्दाचा वापर करत असतात. त्यांचा हाच शब्द ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने अमित शाह यांच्यावर टीका करण्यासाठी वापरला आहे. तृणमूल मोठ्या संख्येने टी-शर्टची छपाई करणार असून, ऑक्टोबरमध्ये दुर्गा पुजेदरम्यान त्यांचा वापर करत मोहीम राबवली जाणार आहे.

हेही वाचा – सुवर्ण मंदिराजवळ तंबाखूचं सेवन करणाऱ्याची निहंग शिखांकडून हत्या, पण सीसीटीव्हीत महिला दिसल्याने गूढ वाढलं

“थट्टा करणं हा संवाद साधण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. आमचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केलेल्या विधानंतर याची सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला. यानतंर हे टी-शर्टवर आलं आहे,” असं तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी २ सप्टेंबरला कोळसा तस्करी घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सात तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ‘अमित शाह भारतातील सर्वात मोठे पप्पू’ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अभिषेक बॅनर्जींचे चुलत बंधू आकाश बॅनर्जी आणि आदिती यांनी सोशल मीडियावर अमित शाह यांचं कार्टून आणि पप्पू उल्लेख असणारं टी-शर्ट घातलेले फोटो शेअर केले होते.

हे टी-शर्ट ३०० रुपयांमध्ये कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. हे टी-शर्ट ऑनलाइन उपलब्ध होते. पण आता बाजारातही मिळतील असं ओब्रियन यांनी सांगितलं आहे. दुर्गा पूजेच्या आधी अजून डिझाइन उपलब्ध होतील असंही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, कोलकाता ते दिल्ली विमान प्रवासात त्यांनी हे टी-शर्ट परिधान केलं होतं.

“काँग्रेसला ही मोहीम आवडली पाहिजे. भाजपा त्यांच्या नेत्याची खिल्ली उडवताना हा शब्द वापरत होते. आता त्यांना त्यांच्याच पद्दतीने उत्तर मिळत आहे,” असं ओब्रियन म्हणाले आहेत.

भाजपाचं प्रत्युत्तर –

भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी हा वैयक्तिक हल्ला असून, फ्लॉप शो असल्याचं म्हटलं आहे. “भाजपासोबत लढण्यासाठी तृणमूलकडे कोणताही मुद्दा नाही. यामुळे ते वैयक्तिक लक्ष्य करत आहेत. पक्ष संपण्याच्या मार्गावर चालला असल्याचं यातून दिसत आहे,” असं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trinamool congress mamata banerjee derek obrien amit shah cartoon in indias biggest pappu t shirt design sgy