TMC Rebel MPs explain reasons behind ditching Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेस पक्षातील फूट सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्याप्रकारे फूट पडून दोन गट तयार झाले, त्याप्रमाणे आता तृणमूल काँग्रेसही विखुरली आहे. बंगालमधील विधानसभेत ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी वेगळा गट तयार केला आहे. तर लोकसभेत काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली किमान २० खासदार एकवटले आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये एकाएकी एवढी मोठी फूट का पडली? त्यामागे काय कारणे होती? याबद्दलची माहिती आता पुढे येत आहे.

काकोली घोष दस्तीदार यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या शताब्दी रॉय यांनी तृणमूल काँग्रेसच्या फुटीला भ्रष्टाचार आणि सर्वोच्च नेत्याचा पदाधिकाऱ्यांशी कमी झालेला संपर्क जबाबदार असल्याचे म्हटले. २००९ पासून खासदार असलेल्या शताब्दी रॉय यांची यंदा चौथी टर्म आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘दीदी’ बदलल्या, असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते दीदी म्हणतात.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रॉय म्हणाल्या, दीदी बदलल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या फार बदलल्या होत्या. माझे त्यांच्याशी भावनिक संबंध आहेत. पण कामामध्ये हे संबंध उपयोगी ठरत नाहीत. त्यामुळे मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली ८ जून रोजी टीएमसीच्या खासदारांनी भाजपा नेत्यांची भेट घेतली. तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन एनडीए सरकारला पाठिंबा दर्शवला. शताब्दी रॉय यांना या गटाचे उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काकोली घोष या बंडखोर गटाच्या मुख्य प्रतोद असून त्यांनी आपल्याकडे २० खासदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले.

Yusuf Pathan Resign rumor clarification by Sourav Ganguly | Mamata Banerjee TMC political crisis update | युसुफ पठाण खासदारकीचा राजीनामा देणार चर्चा | सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी टीएमसी वाद
ममता बॅनर्जींसाठी खासदार युसुफ पठाण राजीनामा देण्याच्या चर्चेवर सौरव गांगुलींचे मोठे स्पष्टीकरण

ममता बॅनर्जींशी तुटलेला संपर्क कारणीभूत?

पक्षफुटीचे मुख्य कारण सांगताना शताब्दी रॉय म्हणाल्या, “काही काळापासून ममता बॅनर्जी यांचा संपर्क कमी झाला होता. पक्षात केवळ मोजक्या नेत्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया गेली होती. त्यामुळे इतरांना महत्त्व उरले नव्हते. आमचा आवाज ऐकला जात नव्हता, त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मला लोकांसाठी काम करायचे आहे. पण आमचे कुणी ऐकून घेतले नाही. पक्षातील काही निवडक नेतेच ममता बॅनर्जींच्या जवळ होते. बाकी कुणाला भेटता येत नव्हते.”

मंत्रिमंडळाकडूनही खासदारांची उपेक्षा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर खासदारांनी असाही आरोप केला की, ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील खासदारांकडे दुर्लक्ष करत होते. एखादा निर्णय घेत असताना खासदारांचे मत विचारात घेतले जात नसे. तसेच खासदारांनी एखादी सूचना करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना गप्प राहण्यास सांगितले जात असे.

खासदारांचे बंड आताच का?

तृणमूल काँग्रेसची सत्ता जाताच खासदारांनी बंड का केले? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी बंडखोरांवर आरोप केले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना शताब्दी रॉय यांनी सांगितले, “आम्ही आता बोलतोय कारण बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेस सत्तेत असताना काय चालायचे हे आम्हाला माहीत आहे. आता परिस्थिती बदलली असून मला माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचे आहे.”

शताब्दी रॉय या पूर्वाश्रमीच्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप केला आहे. “तृणमूलच्या काळात भ्रष्टाचार वाढला होता. खालच्या स्तरापासून वरपर्यंत होत असलेला भ्रष्टाचार पाहून माझे मन व्यथित व्हायचे”, अशी प्रतिक्रिया रॉय यांनी दिली.

गद्दार विरुद्ध ‘झुकेंगे नही’

बंडखोर गटाच्या नेत्या काकोली घोष यांनी ‘शीर छाटले तरी झुकणार नाही’, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी कल्याण बॅनर्जी यांनी बंडखोर गटाला गद्दार अशी उपाधी दिली आहे. कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर गटावर तोंडसुख घेतले.

बंडखोरांकडे पुरेसे संख्या बळ नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. तसेच बंडखोर खासदार सत्तेचे भुकेले आहेत, असेही ते म्हणाले.

बंडखोरांना उद्देशून कल्याण बॅनर्जी पुढे म्हणाले, गद्दारांनो, तुम्हाला जर काही तक्रारी होत्या. तर तुम्ही त्या निकालानंतरच कशा काय पुढे आणल्या? निवडणुकीआधीही हे मुद्दे उपस्थित करता आले असते. निवडणुकीच्या निकालानंतर सर्व जण पुढे आले आहेत. सुवेंदू शेखर यांनी काही आरोप केले आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांचे आरोप खरे किंवा खोटे असतील हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्यांनी किमान नैतिकता बाळगत पदाचा राजीनामा तर दिला.

Mamata Banerjee TMC Split
Mamata Banerjee TMC Split: ममतांच्या आंदोलनात फक्त ८ आमदार आणि ६ खासदारांची उपस्थिती, पराभवानंतर तृणमूल काँग्रेसची अवस्था बिकट का झाली? (Photo Credit – PTI)

कल्याण बॅनर्जी यांच्याप्रमाणेच खासदार किर्ती आझाद यांनीही बंडखोरांवर टीका केली. “सुवेंदू शेखर यांच्याप्रमाणे नैतिकता असेल तर बंडखोर खासदारांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी. तुमच्यात थोडी चाड असेल तर तुम्ही जाहीरपणे तृणमूल काँग्रेसशी काहीही संबंध नाही, हे बोला”, असे आव्हान किर्ती आझाद यांनी दिले.