पीटीआय, नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसमधील फूट अधिक ठळक झाली असून, लोकसभेतील फुटीर गटाने पुढील आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. “आम्हाला तृणमूल पक्षाचा संसदीय गट म्हणून मान्यता मिळावी, अशी विनंती बिर्ला यांच्याकडे करणार आहोत,” असे या गटाकडून सांगण्यात आले. तसेच आपल्याला १९ खासदारांचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी दावा केला. मात्र, पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत ही मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या गटाने केला आहे.
बंडखोर खासदार जगदीशचंद्र बर्मा बसुनिया यांनी सांगितले की, फुटीर गटाने लोकसभा अध्यक्षांकडे आधीच आपली मागणी सादर केली आहे. सोमवारी आम्ही औपचारिक दावा करू, असे ते म्हणाले. यासाठी स्वाक्षऱ्या गोळा करण्याची प्रक्रिया ८ जूनला सुरू झाली, आतापर्यंत १९ खासदारांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत अशी माहिती बसुनिया यांनी दिली. मात्र, फुटीर गटाची लोकसभा अध्यक्षांबरोबरची बैठक अद्याप निश्चित झालेली नाही असे सूत्रांनी सांगितले.
बंडखोरांच्या दाव्याला कायद्याचा आधार नाही, असा दावा ममता बॅनर्जी गटाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला. फुटीर खासदारांचा उल्लेख त्यांनी ‘गद्दार’ असा केला. तर, भाजप अमित शहांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन लोटस’ राबवून फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी केला. दरम्यान, खरा पक्ष कोणता हा प्रश्न आता सुटला असून १९ बंडखोर खासदारांचा गट हाच खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपने केला आहे.
त्यांना कायदा माहीत नाही. राज्यघटनेच्या ९१व्या दुरुस्तीमध्ये पक्षात फूट किंवा स्वतंत्र गटाची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. मूळ पक्षाच्या दोन तृतीयांश गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. सर्व १९ फुटीर खासदारांनी राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी. – महुआ मोइत्रा, खासदार, तृणमूल काँग्रेस
स्वाक्षऱ्या केलेले खासदार
काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, बापी हल्दर, शर्मिला सरकार, प्रसून बंदोपाध्याय, जगदीशचंद्र बर्मा बसुनिया, असित कुमार मल, अरुप चक्रवर्ती, रचना बॅनर्जी, सायोनी घोष, खलीलूर रहमान, अबू ताहेर खान, युसूफ पठाण, मिताली बाग, माला रॉय, कालीपद सोरेन, दीपक अधिकारी, जून मालिया आणि पार्थ भौमिक.
