पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या लोकसभेतील २० खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पाठिंबा जाहीर केला आहे. या गटाचे नेतृत्व पक्षाच्या मुख्य प्रतोद काकोली घोष दस्तीदार करत आहेत.

एकीकडे पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी दिल्लीत विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत भाजपविरोधात रणनीतीवर चर्चा करत असताना पक्षातील खासदारांच्या एका गटाने रालोआला पाठिंबा जाहीर केला. घोष यांनी सांगितले की, सुमारे २० खासदारांनी रालोआला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे. या खासदारांनी सध्या तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देण्याचा किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याऐवजी ते स्वतंत्र संसदीय गट म्हणून काम करण्याच्या विचारात आहेत. यामागे पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचे गणित असल्याचे मानले जात आहे. एखाद्या पक्षातील दोन-तृतीयांश सदस्य वेगळा गट निर्माण करत असतील तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकते. सध्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे २८ खासदार आहेत. एका जागा रिक्त आहे. अशा परिस्थितीत २० खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास दोन-तृतीयांश सदस्यांची अट पूर्ण होऊ शकते.

दस्तीदार याच मुख्य प्रतोद

बंडखोर खासदारांच्या गटाचा दावा आहे की, लोकसभेत काकोली घोष दस्तीदार याच अद्याप अधिकृत मुख्य प्रतोद आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यासंबंधीची आवश्यक माहिती लोकसभा सचिवालयाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमांनुसार घोष दस्तीदार यांचेच पद वैध असल्याचा दावा बंडखोर खासदार करत आहेत. याच आधारावर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठविल्याचे सांगितले जात आहे.

राज्यसभा सदस्याचा राजीनामा स्वीकारला

तृणमूल काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ खासदार सुखेंदु शेखर रे यांचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना ई-मेलद्वारे कळवल्याचे रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षात काम करणे कठीण होत असल्याने पक्षाचा तसेच खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.