Angel Chakma Murder: उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये त्रिपुरातील अँजेल चकमा या तरूणाची हत्या केल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांनी मद्य खरेदी करून पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. अँजेल चकमाच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत, तर दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. अँजेलला ९ डिसेंबर रोजी मारहाण झाली होती. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना २६ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. अँजेलची हत्या करण्यापूर्वी त्याला ‘चायनीज’ व ‘मोमो’ असे संबोधून आरोपींनी डिवचले होते. अँजेल चकमाचे वडील बीएसएफचे जवान आहेत.

९ डिसेंबर रोजी देहारादूनमधील सेलाकी मार्केट परिसरात एका वाढदिवसाला आरोपी जात होते. आरोपी यज्ञराज अवस्थी व सुमित यांच्याबरोबर त्यांचे दोन अल्पवयीन मित्र होते. एका मद्य दुकानाजवळ अँजेल चकमा व त्याचा भाऊ मायकल चकमा असताना त्यांचा आरोपींबरोबर वाद झाला. त्या वादातून आरोपींनी अँजेल चकमाला मारहाण केली. मायकल चकमाला देखील मारहाण करण्यात आली. अँजेलला मारहाण करण्याआधी आरोपींनी त्याला ‘चायनीज’ व ‘मोमो’ संबोधून डिवचले, असे मायकलने पोलिसांना सांगितले आहे. अँजेलला मारहाण केल्यानंतर आरोपींनी मद्य खरेदी करून पार्टी केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

देहरादूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी अँजेल चकमाची हत्या वंशवादातून झाली नसल्याचे म्हटले आहे. अँजेलची हत्या ही वंशवादातून झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. वाद झाल्यानंतर झालेल्या मारहाणीत अँजेल जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला, असे अजय सिंह म्हणाले. या प्रकरणी नेगी (वय २५), सुमित (वय २६), ख्वास (वय २१) यांना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर अवस्थी हा फरार आहे. तो मूळ नेपाळचा रहिवासी असून त्याचे वडील हरिद्वार मधील एका मंदिरात पुजारी आहेत. तो नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

अँजेलच्या हत्या प्रकरणाचे राजकीय पडसाद

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. “सत्ताधारी भाजपने द्वेषाचे सामान्यीकरण केले आहे,” अशी टीका राहुल यांनी केली. तर, या प्रकरणाची निर्धारित वेळेत चौकशी पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून न्याय मिळण्याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली. अँजेलची निर्घृण हत्या ही राष्ट्रीय शरमेची बाब आहे. अशा वेळी मौन बाळगणे म्हणजे सहमती दर्शवणे असा अर्थ होत असल्याने, राजकीय व धार्मिक नेत्यांनी ईशान्य भारतातील नागरिकांच्या छळाविरुद्ध बोलले पाहिजे असे आवाहन काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले.