त्रिपुरात विप्लबराज; विप्लबकुमार देव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुरलीमनोहर जोशींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

शुक्रवारी आगरतळा येथे विप्लबकुमार देव यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

त्रिपुरामध्ये शुक्रवारपासून भाजपा पर्वाला सुरुवात झाली. विप्लबकुमार देव यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

त्रिपुरा हा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने डाव्या पक्षांचा पराभव केला. भाजपाच्या या विजयात विप्लबकुमार देव यांचे मोलाचे योगदान होते. भाजपाने त्रिपुऱ्यात मुख्यमंत्रीपदासाठी विप्लबकुमार देव यांची निवड केली. शुक्रवारी आगरतळा येथे विप्लबकुमार देव यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विप्लबकुमार देव यांच्यासह जिश्नू देव बर्मन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर संतना चकमा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विप्लब या निवडणुकीत बनामालापूर मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढविली होती.

कोण आहेत विप्लबकुमार देव ?
गोमती जिल्ह्यातील राजेंद्रनगर येथे २५ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या विप्लब यांनी उदयपूर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील हरधन देव हे जनसंघाचे नेते असल्याने त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संघविचारांची होती. पदवी घेतल्यानंतर ते लगेचच दिल्लीला गेले. तिथे त्यांनी संघकामाला सुरुवात केली. गोविंदाचार्य व कृष्णगोपाल शर्मा या दोन ज्येष्ठ संघनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्षे त्यांनी संघाचे काम केले. २०१५ मध्ये ते पुन्हा त्रिपुरात परतले. भाजपचे त्रिपुरा प्रभारी व संघ प्रचारक राहिलेल्या सुनील देवधर यांनी विप्लब यांच्यातील नेतृत्वगुण पाहून पक्षात सक्रिय केले. जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. उत्तम संघटनकौशल्य व वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अगदी स्थानिक पातळीवर पक्षाची उभारणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tripura swearing in bjps biplab deb takes oath as cm