TMC MP Rebellion Mamata Banerjee BJP Operation Lotus : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील फूट अधिकच ठळक झाली आहे. पक्षाच्या बंडखोर नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी आपल्या गटात आणखी दोन खासदार सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यापूर्वी त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे बंगालमधील एकूण बंडखोर खासदारांची संख्या २२ पर्यंत पोहण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी बंडखोर गटातील खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतःला एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची आणि सभागृहात सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या बाजूला बसण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत ही मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या गटाने केला आहे.

पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी बंडखोर गटाला लोकसभेतील तृणमूलच्या एकूण २८ पैकी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच १९ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काकोली घोष दस्तीदार यांनी रविवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी कोलकाता विमानतळाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. आम्ही बैठकीसाठी दिल्लीला जात असून आमच्याकडे सध्या २० खासदारांचे संख्याबळ आहे. उर्वरित दोन खासदारऔपचारिकरित्या गटात सामील झाल्यानंतर त्यांची नावे जाहीर केली जातील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिला आहे. सोमवारी आम्ही त्यांची भेट घेऊन स्वतंत्र गट म्हणून मान्यता मागणार असल्याचे दस्तीदार यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत पश्चिम बंगालमधील गंभीर परिस्थितीबाबत प्रामाणिकपणे आवाज उठवणारे अनेक नेते आमच्या संपर्कात असून खासदारांची संख्या २२ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बंडखोर खासदारांची बैठक सुरुवातीला कोलकात्यात होणार होती. या बैठकीला पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी हेदेखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, ही बैठक आता दिल्लीत हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून बंडखोर खासदार सायोनी घोष, माला रॉय, शताब्दी रॉय, अरूप चक्रवर्ती आणि काकोली घोष दस्तीदार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू झालेला अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत आहे. पक्षाच्या लोकसभा गटातील अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारले असून पक्षातील फूट स्पष्टपणे दिसून येत आहे.

दुसरीकडे- बंडखोर आमदारांच्या गटाने ममता बॅनर्जी यांनी पक्षातून दूर ठेवलेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या ८० आमदारांपैकी सुमारे ६० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेतही अशाच प्रकारची फूट पडल्यास ममता बॅनर्जी यांचे पक्षावरील नियंत्रण आणखी कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बंडखोरांच्या दाव्याला कायद्याचा आधार नाही, असा दावा ममता बॅनर्जी गटाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला. त्यांनी फुटीर खासदारांचा उल्लेख त्यांनी ‘गद्दार’ असा केला आहे, तर भाजपा अमित शाहांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन लोटस’ राबवून प्रादेशिक पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार कीर्ती आझाद यांनी केला आहे. खरा पक्ष कोणता हा प्रश्न आता सुटला असून बंडखोर खासदारांचा गट हाच खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपाने केला आहे.

बंडखोर गटाला समर्थन देणाऱ्यांमध्ये काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, बापी हल्दर, शर्मिला सरकार, प्रसून बंदोपाध्याय, जगदीशचंद्र बर्मा बसुनिया, असित कुमार मल, अरुप चक्रवर्ती, रचना बॅनर्जी, सायोनी घोष, खलीलूर रहमान, अबू ताहेर खान, युसूफ पठाण, मिताली बाग, माला रॉय, कालीपद सोरेन, दीपक अधिकारी, जून मालिया आणि पार्थ भौमिक यांचा समावेश आहे. दरम्यान, बंडखोरांना कायदाच माहीत नाही. राज्यघटनेच्या ९१व्या दुरुस्तीमध्ये पक्षात फूट किंवा स्वतंत्र गटाची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. मूळ पक्षाच्या दोन तृतीयांश गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. सर्व १९ फुटीर खासदारांनी राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे.