मुदतीआधी तेलंगणा विधानसभा बरखास्त करणाऱ्या चंद्रशेखर राव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. विधानसभा बरखास्तीनंतर काही तासांनी राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने १०५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाच्या दोन विद्यमान आमदारांना तिकिट नाकारण्यात आले असून सध्या लोकसभेत खासदार असणारे पीड्डापाल्ली बी सुमन विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

चंद्रशेखर राव यांच्या सरकारने आज एकमताने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकारचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंत आहे. तत्पूर्वीच टीआरएस सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान, राव हे ६ तारीख शुभ मानतात. त्यामुळेच त्यांनी आज हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

राज्यपालांनी त्यांचा हा प्रस्ताव मंजूर केला असून नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या वर्षाअखेर चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी किंवा मे महिन्यात लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू होत्या.

विधानसभा बरखास्त केल्यानंतर राव हे रंगारेड्डी जिल्ह्यातून एका मोठ्या रॅलीचे आयोजन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली होती.