अपघात ही एक दु:खद आणि दुर्दैवी बाब असली, तरी काही अपघात वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा हे अपघात ज्या प्रकारे घडतात, ते प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होतात. आंध्रप्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातही असा एक अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र, अपघातस्थळी हजारो बीअरच्या बाटल्यांचा सडा पडलेला पाहून स्थानिकांनी मात्र एकच गर्दी केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

हा अपघात झाला तो सोमवारी संध्याकाळी अनकपल्ली आणि बय्यावरमला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर. बीअरच्या बाटल्या भरलेले तब्बल २०० बॉक्स घेऊन जाणारा एक ट्रक एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटला. त्यामुळे ट्रकमधील बॉक्स रस्त्यावर पडले आणि त्यातल्या बिअरच्या बाटल्या रस्त्यावर इतस्तत: पसरल्या.

दरम्यान, ट्रक आडवा झाल्यामुळे ट्रचा चालक आणि क्लीनर हे दोघेही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये तोल जाऊन एका बाजूला पडले. हा अपघात पाहून काही स्थानिकांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. त्यांच्या मागोमाग इतरही काही स्थानिक धावले. हळूहळू अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. पण स्थानिकांनी चालक किंवा क्लीनर यांना वाचवायचं सोडून थेट बीअरच्या बाटल्यांच्या दिशेनं मोर्चा वळवला. रस्त्यावर पडलेल्या शेकडो बाटल्या गोळा करण्यासाठी सगळ्यांनी धाव घेतली.

या घटनेचा व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेनं ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये पलटी झालेला ट्रक, त्यातून खाली रस्त्यावर पडलेले बॉक्स आणि त्यातून खाली पसरलेल्या बाटल्या दिसत आहेत. पण त्याहून जास्त गर्दी या बाटल्या उचलणाऱ्या स्थानिकांची झाल्याचं दिसून येत आहे. खाली पडलेल्या बाटल्या उचलून घेण्याची एकच स्पर्धा या लोकांमध्ये लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अशाच प्रकारच्या काही घटना याआधीही आंध्र प्रदेशमध्ये घडल्याचं डेक्कन हेराल्डनं दिलेल्या वृत्तामध्ये नमूद केलं आहे.

Live Updates