भारताने पाकिस्तानसोबत होणारी बैठक रद्द केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली हत्या आणि बुरहान वानीचा फोटो असणारं टपाल तिकीट जारी केल्याने संतप्त भारताकडून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी यांच्यात होणारी प्रस्तावित चर्चा रद्द करण्यात आली. निर्णय जाहीर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा जगासमोर आला असल्याचं म्हटलं आहे.

‘नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करणं निरर्थक आहे’, असं रवीश कुमार यांनी सांगितलं. ‘दोन्ही देशांतील परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बैठक होणार असल्याचं जाहीर केल्यापासून दोन व्यथित करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे आपल्या सुरक्षा जवानांची निदर्यीपणे करण्यात आलेली हत्या आणि दुसरी म्हणजे पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचा गवगवा करणारी २० टपाल तिकीट जारी करण्यात आली आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पाकिस्तानने चर्चेच्या निमित्ताने नवी सुरुवात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यामागे त्यांचा छुपा अजेंडा होता हे आता स्पष्ट झालं असून तो उघड झाला आहे. या निमित्ताने पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, आणि तोदेखील काही महिन्यांमध्येच’.

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार होत्या. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली म्हणून पाकिस्तान संबंधीच्या आमच्या धोरणात लगेच कोणताही बदल होणार नाही किंवा द्विपक्षीय चर्चाही सुरु होणार नाही असे असे भारताने स्पष्ट केले होते. मात्र या भेटीमुळे केंद्र सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.