Trump Admin Mr Singh Ad deletion : यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (DHS) गुरुवारी सेल्फ डिपोर्टेशनची एक जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीत शीख समुदायाला लक्ष्य केल्याच्या आरोप करण्यात आला असून याला प्रचंड विरोध झाला होता. “मिस्टर सिंग” यांना सेल्फ डिपोर्टेशन (मायदेशी पाठवण्याचं) करण्याचं आवाहन करणाऱ्या या जाहिरातीवर भारतीय-अमेरिकन गट आणि डेमोक्रेटिक नेत्यांनी वर्णद्वेषी प्रचार म्हणून तीव्र टीका केली होती.

DHS ने एका मोहिमेअंतर्गत एक्सवर एक एआयनिर्मिती जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये एका तपकिरी रंगाची दाढी असलेल्या व्यक्तीला दाखवण्यात आलं होतं. अमेरिकेतील परवाना नसलेल्या व्यावसायिक चालकांविरोधात ही जाहिरात होती. “आमच्या रस्त्यांवरून बाजूला व्हा, तुम्हाला गाडी चालवता येत नाही मिस्टर सिंग”, अशी या जाहिरातीचा टॅगलाईन होती. या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. परिणामी ही जाहिरात आता हटवण्यात आली असल्याचं वृत्त हिंदूस्तान टाइम्सने दिलं आहे.

भारतीय नागरिकांकडून जाहिरात हटवण्याचं स्वागत

भारतीय नागरिकांच्या वकिली गटांनी ही जाहिरात हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू अमेरिकन फाउंडेशनने म्हटलं आहे की, “आम्ही काल ज्या पोस्टवर आक्षेप घेतला होता, ती DHS ने आता हटवली आहे. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु जेव्हा एखादी फेडरल एजन्सी राजकीय फायदा घेण्यासाठी भारतीय/शीख व्यक्तीचं वर्णद्वेषी व्यंगचित्र वापरते, तेव्हा पोस्ट काढून टाकणं हे केवळ पहिलं पाऊल ठरतं.”

या ट्रान्सफॉर्मर्स-शैलीतील जाहिरातीचा स्क्रीनशॉट शेअर करत कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी DHS वर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे अत्यंत घृणास्पद आहे. ट्रम्प सरकार शीख समुदायाला लक्ष्य करणारा वर्णद्वेषी प्रचार पसरवत आहे.” या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून DHS ने ट्रक चालक हरजिंदर सिंग याच्याशी संबंधित दुसरी पोस्ट शेअर केली. हरजिंदर सिंग याला गेल्या वर्षी एका बेकायदेशीर यु-टर्नमुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर अटक करण्यात आली होती.

कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरना उत्तर देताना DHS ने कॅप्शनमध्ये लिहिलं, “हे बघा गॅविन, तुम्हीच त्याला (हरजिंदर सिंग) कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स (CDL) दिलं होतं आणि त्यानंतर त्याने आपल्या ट्रॅक्टर-ट्रेलरने तीन जणांचा जीव घेतला.” कॅलिफोर्नियाचे सिनेट सदस्य ॲडम शिफ यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली आणि DHS च्या या जाहिरात मोहिमेला “द्वेषपूर्ण, अपमानास्पद आणि अन-अमेरिकन” म्हटलं. त्यांनी ‘X’ वर लिहिलं की, “प्रशासन आणि DHS त्यांची उघड कट्टरता लपवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत. ते लाखो अमेरिकेच्या नागरिकांच्या पार्श्वभूमीवर आणि दिसण्यावर, विशेषतः या प्रकरणात शीख समुदायावर संशय निर्माण करत आहेत.”

शीख आणि हिंदू वकिली गटांचा हल्लाबोल

हिंदू अमेरिकन फाउंडेशन, शीख कोअलिशन, हिंदू ॲक्शन आणि कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका यांसह अनेक वकिली गटांनी या “अन-अमेरिकन आणि वर्णद्वेषी” जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेतला. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (HAF) ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले की, “सिंग हे हिंदू आहेत, ते शीख आहेत, ते अमेरिकन आहेत आणि ते गाड्या चालवतात. @DHSgov कडून करण्यात आलेली ही वर्णद्वेषी, अन-अमेरिकन, भारतविरोधी प्रोफाइलिंग/ट्रोलिंग आपल्या देशाच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धीला धक्का देणारी आहे.”

HAF ने असिस्टंट ॲटर्नी जनरल हरमीत के. धिल्लन आणि FBI संचालक काश पटेल यांना टॅग करत म्हटले की, या फेडरल एजन्सीची ही भेदभावपूर्ण पोस्ट राजकीय संदेशाच्या पलीकडची आहे आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. DHS आपल्या ‘CBP होम’ कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी ही मोहीम राबवत आहे. या अंतर्गत कागदपत्रे नसलेले स्थलांतरित स्वेच्छेने युनायटेड स्टेट्स सोडू शकतात. याकरता त्यांना नोंदणी करावी लागणार असून त्यांना प्रवासाचं सहाय्यही केलं जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे २६०० अमेरिकन डॉलर्स एक्झिट बोनसही मिळणार आहे.