DHS Mr Singh Controversy: अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (होमलँड सिक्युरिटी) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. स्वतः देशातून निघून जा किंवा परिणाम भोगायला तयार व्हा, असा संदेश या जाहिरातीमधून भारतीयांना देण्यात आला आहे. या जाहिरातीवर आता टीका होत असून अनेकांनी याला वंशवादी आणि भारत विरोधी म्हटले आहे. एआयच्या मदतीने तयार केलेली ही पोस्ट होमलँड सिक्युरिटीच्या अधिकृत हँडलवर शेअर करण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही काळापासून स्थलांतरितांविरोधात सुरू केलेल्या आक्रमक कारवाईचा प्रत्यय यातून येत आहे.
हॉलिवूडच्या ट्रान्सफॉर्मर्स या चित्रपटातील ‘ऑप्टिमस प्राइम’ या रोबोटिक पात्राचा वापर करून सदर जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये दाढी असलेल्या एका भारतीय चेहरेपट्टीच्या व्यक्तीला ‘मि. सिंग’ असे संबोधून अमेरिकेतून निघून जाण्याची धमकी देण्यात आली आहे. “स्वतःहून निघून जा, नाहीतर परिणाम भोगण्यासाठी तयार व्हा”, असा इशारा ऑप्टिमस प्राइम देतो.
या पोस्टमध्ये फोटोखाली एक संदेशही लिहिला आहे. “आमच्या रस्त्यांवरून चालते व्हा. मि. सिंग गाडी कशी चालवायची हे तुम्हाला कळत नाही”, भारतीय आणि शीख आडनाव वापरून तयार केलेल्या या पोस्टमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
होमलँड सिक्युरिटीने गेल्या काही काळापासून अवैध स्थलांतरित आणि स्थलांतरित ट्रक चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सदर पोस्ट केल्याचे सांगितले जाते.
याचबरोबर एक व्हिडीओही पोस्ट केला गेला आहे. ज्यात ट्रान्सफॉर्मर्स सिनेमातील खलनायक मेगाट्रॉन दाखवला गेला आहे. व्हिडीओमधील हा मेगाट्रॉन रस्ते अपघात आणि इतर गुन्ह्यांसाठी अटकेत असलेले चालक हरजिंदर सिंग, राजिंदर कुमार, जसवीर सिंग आणि इतरांची सुटका करण्याची मागणी करतो.
या व्हिडीओबरोबर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, तुम्ही जर चुकीच्या हेतूने आमच्या देशात वावरत असाल तर आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. अमेरिकन संस्कृतीचे आणि आमच्या घराचे आम्ही रक्षण करू.
हिंदू आणि भारतीय संघटनांकडून विरोध
होमलँड सिक्युरिटीच्या या जाहिरातीनंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हिंदू अमेरिकन फाऊंडेशन (एचएएफ) आणि शीख कोएलिशन यासारख्या संघटनांनी या जाहिरातीचा विरोध केला आहे. एचएएफने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, “हिंदू आणि शीखांमध्ये सिंग येतात. ते अमेरिकन असून वाहन चालवणे त्यांचा हक्क आहे. होमलँडने केलेल्या भारतविरोधी, बिगरअमेरिकन जाहिरातीमुळे आमच्यासारख्यांच्या राष्ट्रीय भावनेला धक्का बसला आहे.”
फाऊंडेशनने केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये अतिरिक्त महाधिवक्ता हरमीत के ढिल्लन आणि एफबीआयचे संचालक काश पटेल यांनाही टॅग केले आहे. “फेडरल यंत्रणेकडून राजकारणाच्या पलीकडे जात भेदभाव दर्शवणारी पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल सुरू केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागत करतो”, असे एचएएफने म्हटले आहे.
होमलँड सिक्युरिटीच्या माहितीनुसार, जे स्थलांतरित स्वतःहून देश सोडून जाण्यासाठी नोंदणी करत आहेत. त्यांना प्रवास सहाय्य म्हणून २,६०० डॉलर्सचा बोनस दिला जात आहे.
