US Army Commander remarks on Jesus and Trump: अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला आहे. इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची क्रूर राजवट उलथवून लावण्यासाठी सदर हल्ला केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत आहेत. दरम्यान अमेरिकन लष्कराच्या एका बैठकीत वरिष्ठ कमांडरने या हल्ल्याचा उद्देश सांगत असताना ट्रम्प यांचा उल्लेख करत धार्मिक विधान केल्यामुळे नवा वाद ओढवला आहे. मिलिटरी रिलिजियस फ्रिडम फाऊंडेशनने प्रकाशित केलेल्या अहवालात सदर ठपका ठेवण्यात आला आहे. इराण विरोधातील लढाईला धार्मिक रंग दिल्याचा आरोप युनायटेड स्टेट्सच्या लष्करातील काही सैनिकांकडून करण्यात आला आहे.
मिलिटरी रिलिजियस फ्रिडम फाऊंडेशन अर्थात एमआरएफएफ ही एक स्वयंसेवी संस्था असून ती अमेरिकन लष्करातील सैनिकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम करते.
३ मार्च रोजी या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालात नमूद केले की, अमेरिकेच्या विविध ५० लष्करी प्रतिष्ठानमधील तब्बल २०० सैनिकांनी त्यांचा कट्टर ख्रिश्चन कमांडर आणि त्यांनी विद्यमान लढाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल केली.
इराणविरुद्धचा संघर्ष दैवी योजनेचा भाग
एमआरएफएफशी संलग्न असलेल्या नॉन कमिशन्ड ऑफिसर (एनसीओ) ची एक प्रतिक्रिया या अहवालात आहे. एनसीओने आरोप केला की, एका अमेरिकन लष्करी कमांडरने लढाई आधीच्या बैठकीत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा भगवान येशून अभिषेक केला असून इराणविरुद्ध सुरू असलेला संघर्ष हा दैवाच्या दैवी योजनेचा भाग आहे.
या अहवालातील तक्रारीनुसार, सदर कमांडरने बायबलमधील ‘आर्मागेडॉन’ प्रसंगाचे कथन केले. तसेच येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाबद्दलचे अनेक दाखले दिले. कमांडरने म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना येशूने इराणमध्ये आर्मागेडॉन घडवून आणण्यासाठी आणि पृथ्वीवर त्यांचे पुनरागमन व्हावे यासाठी इराणमध्ये अग्नि प्रज्वलित केला आहे.
हिंदुस्तान टाइम्स आणि मनीकंट्रोल संकेतस्थळाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
धार्मिक टिप्पणीमुळे अपप्रचाराला वाव
मुक्त पत्रकार जोनाथन लार्सन यांनी यासंबंधीचा अहवाल सार्वजनिक केला आहे. दरम्यान एमआरएफएफचे अध्यक्ष आणि हवाई दलातील माजी अधिकारी मिकी वेनस्टाईन यांनी वरिष्ठ कमांडरने केलेल्या धार्मिक टिप्पणीचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, अशा धार्मिक विधानांमुळे अल कायदा, इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यासारख्या संघटनांना आयचे कोलीत मिळते. या टिप्पणीमुळे इराण संघर्षात आणखी ठिगणी पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
