Trump Budget 2027 Defense Spending focuses on military superiority : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २०२७ च्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्च १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर अनेक देशांतर्गत कार्यक्रमांच्या निधीत कपात केली आहे. असोसिएटेड प्रेस (AP)ने यासंबंधित वृत्त दिलं आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या या प्रस्तावात संरक्षण दलाच्या खर्चात ४४% वाढ आणि गैर-संरक्षण खर्चात १०% कपात सुचवण्यात आली आहे. ही योजना प्रशासनाचा लष्करी गुंतवणुकीवरील भर दर्शवते.
बजेट संचालक रसेल व्होट यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते, जेणेकरून आपले राष्ट्र सुरक्षित राहील.” राष्ट्राध्यक्षांच्या या अर्थसंकल्पीय प्रस्तावाला कायद्याचे स्वरूप नाही; अंतिम खर्च पातळीवर संसद निर्णय घेईल आणि ते या योजनेत बदल करू शकतात किंवा ती नाकारू शकतात. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, या बजेटमध्ये संरक्षण, इमिग्रेशन अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
बजेटमधील प्रमुख मुद्दे काय?
इमिग्रेशन: इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंटचा निधी सध्याच्या पातळीवरच ठेवला आहे, मात्र प्रौढांसाठी १,००,००० आणि कुटुंबांसाठी ३०,००० बेडपर्यंतची स्थानबद्धता क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे.
गुन्हेगारी आणि सुरक्षा: न्याय विभागासाठी १३% वाढीव निधी आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त तरतूद केली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील राष्ट्रीय उद्यानांच्या देखभालीसाठी १० अब्ज डॉलर्सचा निधी प्रस्तावित आहे.
कपात: जो बायडन यांच्या काळातील पायाभूत सुविधा कायद्यातील १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये कृषी विभागात १९%, गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागात १३%, आणि आरोग्य विभागात १२% कपातीचा समावेश आहे.
बजेटबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, “आपण युद्धे लढत आहोत, अशा वेळी डे-केअर, मेडिकेड किंवा मेडिकेअर यांसारख्या गोष्टींची काळजी घेणे आपल्याला शक्य नाही.” रिपब्लिकन खासदारांनी संरक्षण खर्चातील वाढीचे स्वागत केले आहे, तर डेमोक्रॅटिक नेत्यांनी याला “नैतिकदृष्ट्या दिवाळखोर” योजना म्हटले आहे. अमेरिकेवर सध्या ३९ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज असताना हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
