Trump calls for AI Kill Switch: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील विकासावर नियंत्रण असण्याची गरज आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. एआय क्षेत्रातील वेगवान प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि या प्रगतीमुळे मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी म्हणून त्याला “किल स्विच” देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला बुधवारी दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प एआयचा बँकिंग क्षेत्रातील वापर आणि त्यातील धोके यावर भाष्य केले.

एआयचा गैरवापर होण्याची ट्रम्प यांना भीती

एआयच्या अधिक वापरामुळे बँकिंग क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होण्यासह गैरवापर होण्याची शक्यता, याबाबत ट्रम्प यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. ट्रम्प यांनी देखील एआयचा धोका अधोरेखित केला. तसेच बँकिंगसेवा अधिक सुलभ, सुरक्षित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची देखील गरज त्यांनी व्यक्त केली. एआयवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी सरकारच्या धोरण देखील गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मॉर्निंग विथ मारिया या कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते.

अँथ्रोपिक एआय मॉडेल आणि मायथोस

अँथ्रोपिक एआय मॉडेल आणि क्लाऊड मायथोसचा वापर आणि आगामी काळातील सायबर धोक्यांबाबत सर्वत्र चर्चा होत असताना ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. मायथोसमुळे अतिशय किचकट पद्धतीचे सायबर हल्ले शक्य होतील आणि याचा सर्वाधिक फटका बँकिंग क्षेत्राला बसेल, असा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मायथोस अधिक पॉवरफूल असल्याचा दावा केला जातो तर, अँथ्रोपिकने चाळीसहून अधिक कंपन्यांबरोबर नवीन एआय मॉडेलच्या वापरासाठी करार केल्याची माहिती समोर आली आहे.

ओपन एआयची तयारी

दरम्यान, मायथोस प्रणाली अतिशय पॉवरफूल असून, याचा वापर करुन २७ वर्ष जुनी समस्या सोडविण्यास मदत झाली, असा दावा करण्यात येत आहे. पण, इंटरनेटवर सुरु असलेल्या विविध चर्चानुसार मायथोस कोणतेही सॉफ्टवेअर सहज हॅक करु शकते, एवढी त्यात क्षमता आहे. दरम्यान, सॅम अल्टमन यांची ओपन एआय देखील मायथोसचे स्वत:चे व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर आली आहे.