Trump cancels Iran airstrikes peace deal: इराणवर भीषण हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांतच यू-टर्न घेतला आहे. इराणबरोबर शांतता करारासंबधित सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करत, त्यांनी इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द केल्याची घोषणा गुरुवारी रात्रीच्या सुमारास केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवरुन याविषयी माहिती दिलीय. “सर्वोच्च इराणी नेतृत्वाशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्याला मंजुरीही मिळाली आहे”, असा दावा ट्रम्प यांनी या पोस्टमधून केला आहे.

कराराला मंजुरी मिळाल्याचा ट्रम्प यांचा दावा

“इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेली उच्च स्तरावरीय चर्चा सकारात्मक ठरली असून, त्याला मंजुरीही मिळाली आहे. म्हणूनच, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या नात्याने मी आज रात्री इराणवर होणारे नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्बवर्षाव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ला करण्याचा इशारा देऊन खर्ग बेटावर ताबा मिळवण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली होती. पण, काही तासांतच त्यांनी चर्चेतून तोडगा निघाल्याचा दावा केला आहे.

मध्यस्थांनी बजावली महत्वाची भूमिका

शांतता कराराच्या चर्चेवर दोन्ही बाजूंच्या मध्यस्थांनी व्यापक चर्चा करुन मंजुरी मिळवली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. “या कराराची मूळ संकल्पना आणि त्यातील तपशीलवार मुद्द्यांना संबंधित सर्वच देशांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, तुर्किये, पाकिस्तान, बहरीन, कुवैत, जॉर्डन आणि इजिप्तसह इतर महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. पण, ट्रम्प यांनी या देशांच्या यादीत इराणचा उल्लेख कुठेही केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

तोपर्यंत नाकेबंदी कायम राहणार

करारावर स्वाक्षरी करण्याची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, करार पूर्ण होत नाही तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “वरवर पाहता ही राजनैतिक प्रगती दिसत असली तरी, करार औपचारिकपणे पूर्ण होईपर्यंत अमेरिकी नौदलाची नाकेबंदी कायम राहील”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या दाव्याप्रमाणे कराराला मंजुरी मिळाली असल्यास आणि इराण आणि अमेरिका यांच्यातील करार अंतिम झाल्यास जगासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.