Trump claims China won’t supply arms to Iran: चीनने इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही असा वायदा केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चिनी अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याशी स्वत: चर्चा करुन हा मुद्दा उपस्थित केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जिंगपिंग यांनी इराणला शस्त्रपुरवठा न करण्याची हमी दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये मी होर्मुझ सामुद्रधुनी कायमची खुली करत असल्याचे म्हटले आहे. हे मी चीन आणि जगासाठी करतोय, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
चीन आनंदी
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना चीनने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, चीन इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही, अशी हमी देखील त्यांनी दिल्याचे ट्रम्प पोस्टमध्ये म्हणत आहेत. होर्मुझ खुली करण्याचा निर्णयामुळे चीन खूप आनंदी असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर नक्की काय पोस्ट केली आहे?
“मी होर्मुझ सामुद्रधुनी कायमची खुली करतोय यामुळे चीन खूप खूश आहे. हे मी त्यांच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी करतोय. ही परिस्थिती पुन्हा उत्पन्न होणार नाही. इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही यासाठी त्यांनी सहमती दर्शवली आहे. मी काही दिवसांत तिथं (चीनमध्ये) जाईन त्यावेळी अध्यक्ष शी जिंगपिंग मला कडाडून मिठी मारतील. आम्ही फार छान पद्धतीने एकत्र काम करतोय. पण, लक्षात ठेवा गरज पडल्यास आम्ही फायटींगमध्येही चांगले आहोत, इतरांपेक्षा खूप चांगले”, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ट्रम्प यांची जगाला धमकी
ट्रम्प यांनी मंगळवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इराणला शस्त्रपुरवठा करु नये अशी विनंती करणारे पत्र शी जिंगपिंग यांना लिहल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण, जिंगपिंग यांनी शस्त्रपुरवठा करत नसल्याचे स्पष्ट केले होते, असेही ट्रम्प यांनी या मुलाखतीत सांगितले. दरम्यान, इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. तसेच, टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा इशारा देखील दिला होता. यावेळी ट्रम्प यांनी ओबामा यांच्या आण्विक कराराचा देखील उल्लेख केला. इराणने आत्तापर्यंत अण्वस्त्र तयार करुन त्याचा वापर देखील केला असता, असाही दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीत केला.
