Trump claims Doha meeting Iran denies: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये दोहा येथे मंगळवारी बैठक होणार असल्याचे जाहीर केले. पण, ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणने या दाव्याचे खंडन केले आहे. अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा नियोजित नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. यामुळे आता अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
इराणच्या कतार दौऱ्याचा अमेरिकेशी संबंध नाही
अमेरिका आणि इराण यांच्यात काही दिवसांपूर्वी संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने झालेल्या सामंजस्य करार पार पडला यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे परस्परांवर आरोप केले होते. “इराणचे शिष्टमंडळ या आठवड्यात कतारचा दौरा करणार आहे, मात्र या दौऱ्याचा अमेरिकेशी संबंध नाही”, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमेरिकेबरोबर चर्चा नियोजित नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणने काय म्हटले?
“येत्या दिवसांत इराण आणि अमेरिकेत कोणतीही चर्चा नियोजित नाही. तसेच इराणी शिष्टमंडळाच्या कतार दौऱ्याचा तिथे येणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांशी काहीही संबंध नाही,” असे बघाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘अंतिम करारावरील वाटाघाटी अद्याप सुरू झालेल्या नाहीत’, असेही बघाई यांनी पुढे नमूद केले. इराणने चर्चेसाठी विनंती केली आहे, असा ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टद्वारे दावा केला होता. यानंतर व्हाईट हाऊसनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
व्हाईट हाऊसने काय म्हटले होते?
व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर हे उच्चस्तरीय बैठकीसाठी दोहा येथे रवाना होतील, असे म्हटले आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी १७ जून रोजी अमेरिका आणि इराण दरम्यान १४ कलमी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानुसार दोन्ही देशांनी शत्रुत्व समाप्त करण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे मान्य केले होते.
