Trump Claims Iran Permanent Hormuz Opening: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्धविराम झाल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या घोषणेचे स्वागत करत इराणचे आभार मानले आहेत. तसेच, इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा कधीही बंद न करण्याचे मान्य केले आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे.
होर्मुझ खुली करण्याची इराणची घोषणा
“लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने, इराणच्या बंदरे आणि सागरी संघटनेने जाहीर केलेल्या मार्गावरून, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांसाठी युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी मार्ग पूर्णपणे खुला करण्यात आला आहे”, असे इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणच्या या घोषणेचे स्वागत करत इराणला धन्यवाद दिले आहेत. जागतिक तेल व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, इराणने तो पुन्हा सुरू करण्यास संमती दिल्याने जगासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
ट्रम्प यांनी काय म्हटले आहे?
“इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा कधीही बंद न करण्याचे मान्य केले आहे. यापुढे तिचा वापर जगाला वेठीस धरण्यासाठी वापर करणार नाही,” असे स्पष्ट केल्याचे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “इराणने अमेरिकेच्या मदतीने समुद्रातील सर्व माईन्स हटवले आहेत किंवा हटवण्याचे काम करेल”, असे ही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इस्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही – ट्रम्प
इस्रायल यापुढे लेबनॉनवर बॉम्बहल्ले करणार नाही असे स्पष्ट करताना ट्रम्प यांनी अमेरिका लेबनॉनसोबत स्वतंत्रपणे काम करेल आणि हिजबुलाहच्या परिस्थितीला योग्य रीतीने हाताळेल, असे सांगितले. करार पूर्णपणे यशस्वी झालेला नाही पण, आम्ही लेबनॉनला पुन्हा ग्रेट करु, अशी ट्रम्प यांनी पोस्ट केली आहे.
नाटोवर टीका
“होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आता निवळला आहे. मला नाटोकडून मदतीची विचारणा करणारा फोन आला होता. पण मी त्यांना लांब राहण्यास सांगितले. गरजेच्या वेळी त्यांची मदत झाली नाही ते फक्त कागदी वाघ आहेत”, अशी टीका ट्रम्प यांनी नाटोवर केली.
शरीफ-मुनीर यांचे आभार
ट्रम्प यांनी पाकिस्तानचे देखील आभार मानले आहेत. ट्रम्प यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुध असीम मुनीर यांचे देखील कौतुक केले आहे.
