Trump Iran Ceasefire Claim: “इराणने शस्त्रसंधी करण्याची मागणी केली आहे”, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. पण, “अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे आणि पूर्णपणे खुली करण्याची अट इराणसमोर ठेवली आहे”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. होर्मुझची सुरक्षितपणे खुली केल्यास शस्त्रसंधीचा विचार केला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्धाची सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी माध्यमांसमोर येण्यापूर्वी शस्त्रसंधीचा दावा करणारी पोस्ट एक्सवर केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरुच राहतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या शस्त्रसंधीच्या दाव्याबाबत इराणकडून काही स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. २८ फेब्रुवारी सुरु झालेल्या या संघर्षाला आता एक महिना पूर्ण झाला आहे.

शांतता चर्चा

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या शांतता चर्चा सुरु असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प गेल्या आठवड्यापासून करत आहेत. तेहरानकडून मात्र चर्चेचा दावा फेटाळण्यात आला आहे. पाकिस्तानने उभय देशांत शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला अमेरिकेने पाठवलेला १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने धुडकावून लावला होता. दरम्यान, ट्रम्प यांनी केलेला शस्त्रसंधीचा दावा थेट इराणकडून आला आहे का पाकिस्तानकडून याबाबतही स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही.

इंधन आणि गॅसचे संकट कायम

गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जगासमोर इंधन आणि गॅसचे संकट उभे आहे. इराणने भारत, पाकिस्तान, रशिया, चीन यासारख्या मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी केली आहे. पण, अमेरिका, इस्रायल आणि त्यांना या युद्धात मदत करणाऱ्या राष्ट्रांना होर्मुझमधून जाण्यास बंदी घातली आहे. तसेच, इराणने शांतता चर्चेसाठी नकार दिला असून, संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.