Trump Concedes US Midterm Results after Democrats capture the Senate : अमेरिकेच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेट अशा दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय संपादन केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या तब्बल सहा राज्यांमध्ये विजय मिळवत डेमोक्रॅट्सनी सत्ताधारी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. या निकालामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील शेवटची दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. ८० वर्षीय ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेतील मतदारांनी देशव्यापी कौल दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकीचा निकाल स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला यश मिळाल्यास त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली.
आम्ही डेमोक्रॅट्ससोबत काम करू
निवडणुकीच्या निकालानंतर डेमोक्रॅटिक पक्षासोबत सहकार्य करणार का, याबाबत विचारलं असता ट्रम्प यांनी सकारात्मक उत्तर दिलं. “आम्ही डेमोक्रॅट्ससोबत काम करू. त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही बहुधा काहीतरी मार्ग काढू”, असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं डेमोक्रॅटिक पक्षाचं अभिनंदन
तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाला बसलेल्या मोठ्या पराभवावर प्रतिक्रिया देताना डेमोक्रॅटिक पक्षाचं अभिनंदन केलं आहे. ‘डेमोक्रॅट्सनी चांगली कामगिरी केली’, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली. या निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी फॉक्स न्यूजशी फोनद्वारे संवाद साधला. फॉक्स न्यूजचे वृत्तनिवेदक ब्रेट बेयर यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. निवडणुकीपूर्वी वातावरणात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होत होती, असंही त्यांनी सांगितलं.
पॉलिटिकोशी फोनवर बोलताना त्यांनी या पराभवाचं खापर मतदानाचा टक्का आणि उमेदवारांवर फोडले. एबीसी न्यूजनुसार ते म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाला “लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यास प्रवृत्त करता आले नाही”. त्यांनी पुढे असंही म्हटलं की, ते स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात नव्हते आणि बहुतांश मतदारसंघांत मतदारांना उमेदवार आवडले नव्हते.
निकालामुळे आश्चर्य वाटतंय, पण…
“आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या निकालामुळे मला थोडं आश्चर्य वाटलं”, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, पराभवानंतर ट्रम्प यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्यासाठी अनेक मुद्दे असल्याचं त्यांनी नमूद केलं. दोन्ही पक्ष एकत्रितपणे अनेक विषयांवर काम करू शकतात, असंही त्यांनी सूचित केलं. तसंच, मध्यावधी निवडणुकीतील निकालांचा परिणाम म्हणून आपल्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल करण्याचा विचार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
सिनेटमध्ये डेमोक्रॅटिकचा दबदबा
गेल्या अनेक दशकांमध्ये प्रथमच कॅन्सस, टेक्सास आणि साउथ कॅरोलिना या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर निवडून आले आहेत. कॅन्ससमध्ये पाद्री अॅडम हॅमिल्टन यांनी रिपब्लिकन उमेदवार रॉजर मार्शल यांचा पराभव करत अनपेक्षित विजय मिळवला. या राज्यात तब्बल ९४ वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेटची जागा जिंकण्यात यश आले आहे. याशिवाय ओहायो आणि आयोवा या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवत सत्तांतर घडवलं आहे. अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाच्या सहा राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सनी विजय मिळवला आहे.
प्रतिनिधीगृहातही डेमोक्रॅटिक पक्ष आघाडीवर
दरम्यान, प्रतिनिधीगृहातही डेमोक्रॅटिक पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंत पक्षाने १९२ जागा जिंकल्या असून, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाकडून १४ राज्यांतील जागा हिसकावून घेतल्याचा समावेश आहे. सध्या ज्या मतदारसंघांमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आघाडीवर आहे, तेथे पक्षाने आपली आघाडी कायम राखल्यास अमेरिकेच्या काँग्रेसवरही डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण प्रस्थापित होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित अध्यक्षीय कार्यकाळात त्यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या राजकारणात मध्यावधी निवडणुकांना विशेष महत्त्व असतं. या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसाठी मतदान होते. त्यातून सत्ताधारी पक्षाला जनतेचा किती पाठिंबा आहे, याचं चित्र स्पष्ट होतं.
