Donald Trump weighs deploying thousands of US troops in Middle East : इराणविरोधातील सुरू असलेल्या लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प प्रशासन मध्यपूर्वेतील आपला लष्करी प्रभाव वाढवण्याच्या तयारीत असून हजारो अमेरिकन सैनिकांना संभाव्य तैनात करण्याची शक्यता आहे, असं ‘रॉयटर्स’ने वृत्त दिले आहे.

हजारो सैनिक तैनात करणार?

एका अमेरिकन अधिकाऱ्याने आणि या चर्चेची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार, रॉयटर्सने म्हटले आहे की, ही युद्ध मोहीम आता तिसऱ्या आठवड्यात असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अधिक व्यापक पर्याय उपलब्ध करून देणे, हा या प्रस्तावित तैनातीचा मुख्य उद्देश आहे. रॉयटर्सशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मध्यपूर्वेतील ऑपरेशन अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासन हजारो अमेरिकन सैनिक तैनात करण्याचा विचार करत आहे.”

हवाई आणि नौदलाच्या माध्यमातून ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवरून तेल टँकर्सना सुरक्षित मार्ग मिळवून देण्यासह विविध उद्दिष्टांसाठी वापरली जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, ही मोहीम इराणच्या किनारपट्टीवर भूदलाच्या तैनातीपर्यंत देखील वाढवली जाऊ शकते.

धाडसी पर्यायांचा विचार सुरू

यापेक्षा अधिक धाडसी पर्यायांवरही चर्चा सुरू आहे. रॉयटर्सच्या मते, इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकन सैन्य पाठवण्याच्या शक्यतेवरही विचार झाला आहे, जिथून इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी ९०% व्यवहार होतात. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सावध केले की, असे ऑपरेशन अत्यंत जोखमीचे असू शकते, कारण इराण या बेटाला क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य करू शकतो. इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा सुरक्षित करण्याबाबतही चर्चा झाली आहे, जे तज्ज्ञांच्या मते अत्यंत गुंतागुंतीचे आणि धोकादायक ठरू शकते.

असे नियोजन सुरू असले तरी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. “सध्या जमिनीवर सैन्य पाठवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत,” असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रम्प यांचे लक्ष ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’च्या उद्दिष्टांवर असून यामध्ये इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे आणि नौदल कमकुवत करणे यांचा समावेश आहे. पेंटागॉनने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. यूएस सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ७,८०० हून अधिक हल्ले करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भूदलाला तैनात करणे राजकीय आणि लष्करी दृष्टीने जोखमीचे आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी नवीन युद्धे टाळण्याचे आश्वासन दिले होते. या संघर्षात आतापर्यंत १३ अमेरिकन सैन्य ठार झाले असून सुमारे २०० जण जखमी झाले आहेत.