President Donald Trump expresses his frustration with PM Keir Starmer : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. इराणवर हल्ला करण्यासाठी दिएगो गार्सिया या हवाई तळाचा वापर करण्यास परवानगी नाकारल्यामुळे ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. ते दि टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ब्रिटनने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कायद्याचे कारण देत अमेरिकेला आपल्या तळांवरून हवाई हल्ले करण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, रविवारी संध्याकाळी स्टार्मर यांनी आपला निर्णय बदलला आणि अमेरिकेच्या संरक्षणात्मक (defensive) हल्ल्यांसाठी या तळांच्या वापरास संमती दिली. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, “स्टार्मर यांना निर्णय घेण्यास खूप वेळ लागला. आमच्या दोन्ही देशांमध्ये असे यापूर्वी कधीही घडले नसावे. कदाचित ते याच्या कायदेशीर वैधतेबद्दल विचार करत होते.”
दिएगो गार्सिया हवाई तळ का महत्त्वाचा?
हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया हा अमेरिका आणि ब्रिटनचा अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ आहे. शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ब्रिटनचा सहभाग नव्हता. शनिवारपासून सुरू असलेल्या या संघर्षानंतर इराणने आखाती देशांवर क्षेपणास्त्र डागायला सुरुवात केली आहे.
रविवारी सायप्रस येथील ब्रिटनच्या आरएएफ अक्रोतिरी (RAF Akrotiri) तळावर इराण बनावटीच्या ड्रोनने हल्ला केला, ज्यामध्ये किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रम्प यांनी चागोस बेटांच्या सार्वभौमत्वावरून स्टार्मर यांनी केलेल्या करारावरही टीका केली आहे. दिएगो गार्सिया हे याच बेटांच्या समूहात येते.
