Donald Trump Iran Ceasefire Extension April 22: इराणविरुद्धचा युद्धविराम वाढविण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. दोन आठवड्यांसाठी लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचा आज (२२ एप्रिल) अखेरचा दिवस आहे. यापुढे सौम्य भूमिका घेणार नाही, असे स्पष्ट केलेल्या ट्रम्प यांनी अचानक युद्धविराम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण आता हा युद्धविराम इराणलाच नको झाला असून, त्यांनी थेट कारवाईचा इशाराच अमेरिकेला दिला आहे. इराण संसदेच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार महदी मोहम्मदी यांनी याबाबत एक्सवर अमेरिकेला डिवचणारी पोस्ट केली आहे.
कारवाईचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढविण्याचा घेतलेला निर्णय मोहम्मदी यांनी फेटाळून लावत, तो आम्हाला (इराण) गैरलागू असल्याचे मत मांडले आहे. तसेच, अमेरिकेविरोधात लष्करी कारवाईचा देखील इशारा त्यांनी दिला आहे. मोहम्मदी यांनी अमेरिकीने होर्मुझ सामुद्रधुनीवर केलेली नाकेबंदी देखील अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काय म्हणाले महदी मोहम्मद?
“ट्रम्प यांनी वाढवलेला युद्धविराम आमच्यासाठी निरर्थक आहे. हरणाऱ्यांनी अटी ठरवू नयेत. होर्मुझ सामद्रधुनीत सुरु ठेवलेली नाकेबंदी बॉम्बहल्ल्यांपेक्षा वेगळी नाही. याविरोधात लष्करी कारवाई केली जाऊ शकते. ट्रम्प यांचा युद्धविराम वाढवण्याचा निर्णय म्हणजे पुन्हा हल्ला करण्यासाठी वेळकाढूपणा केल्यासारखं आहे. आता इराणला पुढकार घेण्याची वेळ आली आहे”, असे महदी मोहम्मदी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
होर्मुझची नाकेबंदी अन्यायकारक
महदी मोहम्मदी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत. मोहम्मदी यांनी अमेरिकेन होर्मुझमध्ये केलेली नाकेबंदी अन्यायकारक असल्याचे मत मांडले आहे. ट्रम्प यांनी इराणकडे करार करण्याची अखेरची संधी असून, यापुढे सौम्य भूमिका घेणार नाही, असा इशारा दिला होता. दरम्यान, बुधवारी युद्धविरामाचा अखेरचा दिवस असताना ट्रम्प यांनी अखेर अनिश्चित काळासाठी युद्धविराम वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर महदी मोहम्मदी ट्रम्प यांनी जाहीर केलेला युद्धविराम अमान्य असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांची पोस्ट
“इराणचे सरकार पूर्णपणे कोलमडले आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीनंतर इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणी नेते आणि प्रतिनिधी काही ठोस प्रस्ताव घेऊन येत नाहीत तोपर्यंत हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे ट्रम्प यांनी ट्र्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे. शाहबाज शरीफ यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत शांतता चर्चेसाठी वेळ मिळेल अशी आशा व्यक्त केली.
