Pakistan’s Asim Munir a ‘red flag’ due to secret Iran military ties : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याबद्दलचे जाहीर कौतुक आणि त्यांना आपले आवडते फील्ड मार्शल म्हणून संबोधणे, हे आता अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील एका वर्गासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जनरल मुनीर यांचे इराणच्या लष्करी नेतृत्वाशी असलेले कथित संबंध या चिंतेचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
‘फॉक्स न्यूज’ (Fox News) मधील अहवाल आणि गुप्तचर विभागातील माहितीनुसार, अधिकारी आणि प्रादेशिक विश्लेषक या संबंधांकडे एक ‘धोक्याची सूचना’ म्हणून पाहत आहेत. विशेषतः मुनीर हे वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात ‘बॅकचॅनल’ (छुपा मध्यस्थ) म्हणून काम करत असल्याने हे संबंध अधिक गंभीर मानले जात आहेत.
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) मधील वरिष्ठ नेत्यांशी मुनीर यांची असलेली जुनी जवळीक त्यांची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका गुंतागुंतीची करते, असं तज्ज्ञांचं मत आहे. पाकिस्तानचे निवृत्त जनरल अहमद सईद यांनी फॉक्स न्यूज डिजिटलला सांगितले की, मुनीर यांचे इराणच्या प्रमुख लष्करी व्यक्तींशी वैयक्तिक संबंध आहेत. यामध्ये कुड्स फोर्सचे दिवंगत कमांडर कासिम सुलेमानी आणि IRGC कमांडर हुसेन सलामी यांचा समावेश आहे. या कथित संबंधांमुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुनीर यांच्या राजनैतिक उपयुक्ततेबद्दल सावध पवित्रा घेतला आहे. त्यांना भीती आहे की, अमेरिका आणि इराण या दोन्ही बाजूंकडे मुनीर यांचा असलेला थेट प्रवेश धोरणात्मक जोखीम निर्माण करू शकतो.
ऐतिहासिक चिंतांमुळे वर्तमानातील मूल्यांकनावर परिणाम
अमेरिकन धोरणकर्त्यांमधील ही साशंकता पाकिस्तानच्या प्रादेशिक सुरक्षेतील भूमिकेबाबतच्या जुन्या अनुभवांवर आधारित आहे, विशेषतः अफगाणिस्तान युद्धादरम्यानच्या अनुभवांवर. टीकाकारांनी वारंवार इस्लामाबादला ‘अविश्वसनीय भागीदार’ म्हटले आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानने अमेरिकेकडून मोठी आर्थिक आणि लष्करी मदत घेतली आणि त्याच वेळी तालिबानशी संबंधित नेटवर्कला थारा दिला.
‘फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीज’ (FDD) चे वरिष्ठ फेलो बिल रोगिओ यांच्यासह इतर विश्लेषकांनी इशारा दिला आहे की, पाकिस्तानचा लष्करी इतिहास आणि बदलती प्रादेशिक समीकरणे पाहता त्यांच्याकडे अत्यंत सावधगिरीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, अमेरिका-इराण संबंधात मध्यस्थ म्हणून काम करणे म्हणजे पाकिस्तान अमेरिकेच्या धोरणांशी सहमत आहेच असे नाही; उलट यामुळे आधीच अस्थिर असलेल्या या क्षेत्रात आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. रोगिओ यांनी असा युक्तिवाद केला आहे की, अफगाणिस्तानमधील पाकिस्तानची जुनी वागणूक ध्यानात घेऊनच सध्याची धोरणे ठरवावीत.
