Donald Trump Shooting : वॉशिंग्टन डीसीमध्ये २५ एप्रिल रोजी ‘व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ (WHCD) दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या थरारक घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सशस्त्र रक्षकांच्या पहार्यातही अतिशय शांतपणे आपले जेवण करत असल्याचे दिसत आहे.
काय घडली नेमकी घटना?
वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि जेडी वान्स यांच्यासह अनेक दिग्गज नेते या डिनरसाठी उपस्थित होते. रात्री साधारण ८.३६ च्या सुमारास कोल टॉमस ॲलन नावाच्या एका सशस्त्र व्यक्तीने सुरक्षा कडा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोर यांच्यात गोळीबार झाला. या घटनेमुळे हॉलमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि शेकडो पाहुणे जीव वाचवण्यासाठी टेबलखाली लपले.
जेवण सुरू ठेवणारा ‘तो’ पाहुणा
हॉलमध्ये एकीकडे गोळीबार आणि आरडाओरडा सुरू असताना, एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्यक्ती सुरक्षारक्षकांनी घेरलेले असतानाही अजिबात न डगमगता आपले जेवण करत राहिला. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक त्याच्या या शांत स्वभावाचे कौतुक करत आहेत, तर काही जण याला विचित्र वागणूक म्हणत आहेत.
सुरक्षा आणि तपास
हल्लेखोर कोल टॉमस ॲलन याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून बंदूक आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात एका गुप्तचर सेवा (Secret Service) अधिकाऱ्याला गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्यांचे प्राण वाचले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर सर्व नेते सुरक्षित असून, ट्रम्प यांनी या घटनेला “लोन वुल्फ” हल्ला म्हटले आहे.
