पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपले पूर्वसूरी आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. ‘‘डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कट्टर समर्थक हे अमेरिकी लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. त्यांच्या सत्तेखाली देशात लोकशाहीची शाश्वती नाही. सत्तेच्या जोरावर त्यांना राजकीय हिंसाचार घडवून आणायचा आहे,’’ अशी टीका बायडेन यांनी केली.

फिलाडेल्फियामधील प्रतिष्ठित इंडिपेंडन्स हॉल येथे केलेल्या भाषणात जो बायडेन यांनी ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षावर जोरदार आसूड ओढले. इंडिपेंडन्स हॉल येथे २५० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यामुळे या सभागृहाला अमेरिकी इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सभागृहातून भाषण करताना बायडेन म्हणाले, ‘‘आज रात्री मी येथे उभा असताना, समानता आणि लोकशाहीवर हल्ला होत आहे. अमेरिकी हे लोकशाहीची हमी आहेत, हे आपण बऱ्याच काळापासून स्वत:ला पटवून देत आहोत, पण आता तसे नसल्याचे दिसून येत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या आवाज उठवावा लागेल.’’

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (एमएजीए) विचारसरणी राबवली, ती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत बायडेन यांनी मांडले. ‘‘आज आपल्या देशात जे काही घडत आहे, ते काही ठीक नाही. ट्रॅम्प आणि एमएजीए रिपब्लिकन हे अतिरिकाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे आपल्या प्रजासत्ताकाला धोका आहे. एमएजीए रिपब्लिकन अमेरिकी संविधानाचा आदर करत नाहीत,’’ अशी टीका राष्ट्राध्यक्षांनी केली. अमेरिकेतील एक जुना पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षावर सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि एमएजीए रिपब्लिकन यांचे वर्चस्व असून पक्षाचे खच्चीकरण केले जात आहे, असेही बायडेन म्हणाले.

एमएजीए रिपब्लिकन शक्तींनी या देशाला पिछाडीवर नेण्याचा निर्धार केला आहे. त्यांना अमेरिकेला अशा ठिकाणावर न्यायचे आहे, जिथे निवडणुकीचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार, संततीनियमन करण्याचा अधिकार, ज्यावर प्रेम असेल, त्याच्याशी विवाह करण्याचा अधिकार नसेल. ते हुकूमशाही नेत्यांना प्रोत्साहन देत असून त्यांनी राजकीय हिंसाचाराच्या ज्वाला भडकवल्या आहेत, असा घणाघात बायडेन यांनी केला.

अमेरिकेच्या राजकीय इतिहासात प्रथमच कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पूर्वसूरीचे थेट नाव घेऊन त्यांवर अशा प्रकारे टीका केली. बायडेन यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात वारंवार ट्रम्प यांचे नाव घेतले. ट्रम्प अजूनही २०२०च्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. इतिहास आपल्याला सांगतो की एका नेत्यावर आंधळी निष्ठा असणे आणि राजकीय हिंसाचारात गुंतण्याची तयारी लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असे बायडेन म्हणाले. २०२०मध्ये ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या ७४ दशलक्ष अमेरिकी नागरिकांचा मी बिलकूल निषेध करणार नाही. प्रत्येक रिपब्लिकन, अगदी बहुसंख्य रिपब्लिकन हे एमएजीए रिपब्लिकन नाहीत, असेही बायडेन यांनी सांगितले. एमएजीए रिपब्लिकनचा उल्लेख बायडेन यांनी बंडखोर, निवडणुकीला नकार देणारे,  अराजकतावादी असा केला. अमेरिकेत ८ नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये अमेरिकी सिनेटमध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व स्थापित होईल, हे समजणार आहे.