वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केल्याप्रमाणे मंगळवारपासून १० टक्के आयातशुल्क लागू झाले असल्याचे सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण (सीबीपी) विभागाने जाहीर केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, त्यांनी १५ टक्के आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली. त्यात बदल होणार नसल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले.

धोरणातील अनिश्चिततेने जागतिक बाजारात उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेने देशांतर्गत बाजारात, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना सव्वा टक्क्याचे मोठे नुकसान झाले. आयात कराबाबत चित्र स्पष्ट भारत अमेरिकेशी व्यापार चर्चा सुरू करेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प आणि ‘सीबीपी’ने केलेल्या वेगवेगळ्या घोषणांमुळे आयातशुल्काच्या नेमक्या दरावरून गोंधळ कायम आहे. सवलती दिलेल्या वस्तू वगळता, सर्व आयात वस्तूंवर अतिरिक्त १० मूल्यानुसार (ॲड व्हॅलोरेम) कर लागू केला जाणार आहे, असे ‘सीबीपी’च्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेने विविध देशांशी केलेल्या व्यापार करारात निर्धारित करण्यात आलेल्या आयातशुल्कावर अतिरिक्त १० टक्के आयातशुल्क आकारले जाणार आहे का, हा गुंता सुटलेला नाही.

ट्रम्प यांनी १५ टक्क्यांची घोषणा केली असतानाही त्यापेक्षा कमी आयातशुल्क दर का लागू करण्यात आला, याचे स्पष्टीकरण ‘सीबीपी’ किंवा ट्रम्प प्रशासनाने दिलेले नाही. तसेच ही पंधरा टक्क्यांची वाढ केव्हापासून लागू होणार हे स्पष्ट झाले नाही. व्हाइट हाऊसच्या एका अधिकार्‍याने ‘फायनान्शिअल टाइम्स’ला अशी माहिती दिली की, १५ टक्के आयातशुल्क नंतर लागू केले जाईल.

गुंतवणूकदारांना फटका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्कासंबंधी धोरणाबाबत वाढलेल्या अनिश्चिततेने जागतिक बाजारात उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेचे अनुकरण करत खुल्या झालेल्या देशांतर्गत बाजारात, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना तब्बल सव्वा टक्क्याचे मोठे नुकसान मंगळवारी सोसावे लागले. दिवसभरात १,३६० अंशांच्या घसरणीतून ८२ हजारांची पातळी मोडत सेन्सेक्स, दिवसाचे व्यवहार थंडावताना १,०६८.७४ अंशांची (१.२८ टक्के) तूट सोसत, ८२,२२५.९२ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २८८.३५ अंशांच्या घसरणीतून २५,४२४.६५ वर बंद झाला.

ट्रम्प यांच्याविरोधात वाढती नाराजी

डोनाल्ड ट्रम्प हे वयोमानानुसार अधिक लहरी होत आहेत, असे अमेरिकेतील बहुसंख्य जनतेला वाटत असल्याचे ‘रॉयटर्स’ आणि ‘इप्सॉस’ने केलेल्या जनमत चाचणीतून समोर आले आहे. ट्रम्प ७९ वर्षांचे असून जगातील वयाने सर्वात ज्येष्ठ राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहेत. ट्रम्प काँग्रेसमध्ये वार्षिक भाषण करण्याच्या एक दिवस आधी, सोमवारी या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार, ६१ टक्के अमेरिकी व्यक्तींनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे, चाचणीत सहभागी झालेल्यांमध्ये ३० टक्के लोक रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आहेत.

‘करार रद्द करण्याचे धाडस दाखवा’

भोपाळ  : भारताने दबावाखाली अमेरिकेशी करार केला आहे. तो रद्द  करण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. किसान महाचौपाल सभेत त्यांनी हा करार शेतकर्‍यांच्या मुळावर येणारा असल्याची टीका केली. नरेंद्र मोदी यांनी देशहिताशी तडजोड केली.

हा करार नसून शेतकर्‍यांच्या हृदयात घुसलेला बाण आहे, अशा शब्दांत त्याची संभावना केली.  अमेरिकेत आयातशुल्काबाबत चित्र अधिक स्पष्ट होईल तेव्हाच भारत सरकार कराराबाबत चर्चा सुरू करेल. – पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री