काश्मीर प्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताला आयसिस विरोधात लढाई लढण्याचे आवाहन केले आहे. भारताने अफगाणिस्तानात आयसिसशी दोन हात करावेत असे ट्रम्प यांनी सुचवले आहे. भारत, रशिया, टर्की, इराण, इराक आणि पाकिस्तान या देशांनी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटविरोधात लढाई आणखी तीव्र केली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारत अफगाणिस्तानात आहे पण ते आयसिसशी लढा देत नसून आम्ही ही लढाई लढत आहोत असे ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तालिबानशी शांततेच्या वाटाघाटी सुरु असल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानात सैन्य ठेवणार कि, मागे घेणार त्यासंबंधीच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. पाकिस्तान पूर्ण क्षमतेने आयसिस विरोधात लढत नसल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा अफगाणिस्तानातील भारताच्या भूमिकेवर टीका केली होती. इराक आणि सीरियामधून आयसिस हद्दपार होत असताना त्यांना अफगाणिस्तानात जम बसवण्याची संधी मिळत आहे. मागच्या आठडयात अफगाणिस्तानात एका लग्न सोहळयात बॉम्बस्फोट घडवला. त्यात ६३ नागरीकांचा मृत्यू झाला. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघारी बोलवायचे आहे. दीर्घकाळापासून अमेरिका अफगाणिस्तानात युद्ध लढत आहे. सप्टेंबर २००१ पासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात आहे.