Trump Iran ceasefire and Hormuz blockade latest update : अमेरिका-इराणमधील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत आज, बुधवारी संपत आहे. परंतु, दोन्ही देशांतील चर्चा अनिश्चित राहिल्याने पुन्हा युद्धाचा आगडोंब उसळणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलासा दिला आहे. त्यांनी युद्धविराम वाढवला असल्याची मोठी माहिती दिली आहे. जोपर्यंत इराणी नेते एकसंध प्रस्ताव मांडत नाहीत आणि सुरू असलेली चर्चा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही शस्त्रसंधी लागू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, पाकिस्तानने लष्करी कारवाईला स्थगिती देऊन मुत्सद्देगिरीसाठी वेळ देण्याची विनंती केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका अधिकृत निवेदनात ट्रम्प यांनी सविस्तर माहिती दिली की, फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या थेट विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

ट्रम्प म्हणाले, “इराणचे सरकार गंभीरपणे विखुरलेले आहे, हे अनपेक्षित नाही. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विनंतीनुसार, इराणच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी एकसंध प्रस्ताव सादर करेपर्यंत आम्ही इराणवरील आमचा हल्ला रोखला आहे. त्यामुळे, मी आमच्या सैन्याला नाकेबंदी सुरू ठेवण्याचे आणि इतर सर्व बाबतीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचा प्रस्ताव सादर होईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत मी शस्त्रसंधी वाढवत आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रूथवरील पोस्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्लामाबादला गेले नाहीत

या निर्णयामुळे तणाव तात्पुरता कमी झाला असला तरी, नाकेबंदी आणि लष्करी सज्जतेद्वारे इराणवर दबाव कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स नियोजित वेळापत्रकानुसार मंगळवारी इस्लामाबादला रवाना झाले नाहीत. ते वॉशिंग्टनमध्येच थांबले असून, त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली.

ट्रम्प यांच्या या घोषणेच्या काही तास आधी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक्सवर (X) पोस्ट करत इराणच्या बंदरांवरील नाकेबंदीला “युद्धजन्य कृती” आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हटले होते. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेणे यामुळे तणाव वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुसरीकडे, इराणच्या ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणने पाकिस्तानमधील आगामी चर्चेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आपल्या अवाजवी मागण्यांपासून मागे हटण्यास नकार दिल्याने इराणने हा निर्णय घेतल्याचे समजते.

इराणला कटाचा संशय

इराणचे संसदीय अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ यांच्या सल्लागाराने म्हटले की, ट्रम्प यांचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय हा अचानक हल्ला करण्यासाठी वेळ मिळवण्याची एक युक्ती आहे. बंदरांची नाकेबंदी ही बॉम्बेहल्ल्यापेक्षा वेगळी नसून त्याला लष्करी प्रत्युत्तर दिले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले आभार

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “माझ्या आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या वतीने, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आभारी आहे की त्यांनी मुत्सद्दी प्रयत्नांसाठी आमची शस्त्रसंधी वाढवण्याची विनंती मान्य केली.” पाकिस्तान वाटाघाटीतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.