Donald Trump Iran Blockade at Strait of Hormuz triggers global oil crisis : पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये गेल्या आठवड्यात चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या वाटाघाटीतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीची घोषणा केली. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे, सुमारे महिनाभर चालले युद्ध आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर इराणच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्याने इराणचे दररोज ४३५ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ४०८१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्सच्या निर्यातीतून मिळणाऱ्या २७६ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

विश्लेषकांच्या मते, इराणचे किती नुकसान होऊ शकते हे विविध घटकांवर अवलंबून असणार आहे. जसे की, अमेरिकेची नाकेबंदी किती अभेद्य असेल, तसेच इराणला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाहेर असलेल्या जास्क टर्मिनलमधून कच्च्या तेलाची निर्यात करण्यात कितपत यश येते, याबाबींवर इराणचे नुकसान अवलंबून असणार आहे.

इराणचे आधीच काही तेल हे समुद्रात साठवून ठेवलेले आहे, ज्यामुळे त्यांनी काही प्रमाणत नुकसान भरून काढता येईल. ‘केपलर’ने दिलेल्या आकडेवारीनुसार मार्चअखेरपर्यंत इराणने अंदाजे १५४ दशलक्ष बॅरल तेल नाकेबंदीमुळे प्रभावित झालेल्या आखाताबाहेर काढले होते.

“अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्यामुळे इराणचे दररोज सुमारे ४३५ दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक नुकसान होईल,” असे ट्रेझरी विभागातील ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोलचे माजी अधिकारी मियाद मालेकी यांनी वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना सांगितले. या रिपोर्टनुसार, यामुळे चीनला होणारी ऊर्जा निर्यात देखील रोखली जाईल. चीनची ४५ ते ५० टक्के कच्चे तेल आणि ३० टक्के एलपीजीची आयात ही या सामुद्रधुनीतून होते.

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या वाटाघाटी यशस्वी होऊ न शकल्याने ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, इराणने या सामुद्रधुनीतून येणारे जवळपास सर्व टँकर्स रोखून धरले होते आणि फक्त काही मित्र देशांच्या जहाजांना शुल्क आकारून जाण्याची परवानगी दिली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या पोस्टमधून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या सर्व जहाजांना कडक इशारा दिला. जगातील सर्वश्रेष्ठ नौदल असलेली ‘युनायटेड स्टेट्स नेव्ही’ आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाची नाकेबंदी करण्यास सुरुवात करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

इराणवर ‘जागतिक खंडणीखोरी’ केल्याचा आरोप करत ट्रम्प पुढे म्हणाले की, जर कोणीही अमेरिकन जहाजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना थेट नरकात धाडले जाईल. इराणबरोबर चर्चेसाठी आपण अजिबात उत्सुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणची अवस्था अत्यंत दयनीय आणि हताश असल्याचे सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, सोमवारी सकाळी १० वाजेपासून ही नाकेबंदी लागू होईल. इराणला आता इतर देशांना खनिज तेल विकता येणार नाही. आमच्याकडे रशिया आणि सौदी अरेबियापेक्षाही जास्त तेल साठा उपलब्ध आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने ही नाकेबंदी केवळ इराणी बंदरांवर जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या जहाजांसाठी असेल. अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या आखाती देशांच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना यातून सवलत दिली जाईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.