Trump Iran Islamabad Truce news update: जवळपस ३८ दिवस युद्ध चालल्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्तीने अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. युद्धविरामानंतर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानात उच्चस्तरीय शांतता चर्चाही पार पडली. २१ तास चाललेल्या या चर्चेतून निर्णय होण्याची अपेक्षा होती. परंतु, ही चर्चाच निष्फळ ठरली. त्यामुळे इराणविरोधात पुन्हा एकदा युद्ध पेटणार असल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आज सायंकाळपासून इराणच्या सर्वं बंदरांवर वेढा घालणार असून नाकेबंदी करणार आहे. असं असतानाच इराण पुन्हा अमेरिकेबरोबर चर्चा करणार का प्रश्न उपस्थित होतोय. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.
पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, इराण पुन्हा चर्चा करणार की नाही, याने आपल्याला काहीच फरक पडत नाही, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्पष्ट केले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
इराणकडे अण्वस्त्र कधीच नसेल
फ्लोरिडावरून परतल्यानंतर मेरीलँडमधील जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “ते (इराण) परत चर्चेला येईल की नाही, याची मला पर्वा नाही. ते परत आले नाहीत, तरी मी समाधानी आहे.” ते पुढे म्हणाले, उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये झालेल्या शस्त्रसंधी चर्चेदरम्यान इराणने अण्वस्त्र मिळवण्याचे संकेत दिले होते. त्यांना अजूनही अण्वस्त्र हवे आहे आणि त्यांनी ती बाब परवा रात्री स्पष्ट केली. पण इराणकडे अण्वस्त्र कधीच नसेल”, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जेव्हा अमेरिकन शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये इराणी पथकासोबत चर्चा करत होते, तेव्हाही ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, तेहरानसोबत करार झाला काय किंवा नाही झाला काय, त्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही. शनिवारी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, “काहीही झाले तरी विजय आपलाच (अमेरिकेचाच) असेल.” ते पुढे म्हणाले, “कदाचित ते करार करतील किंवा करणार नाहीत, त्याने काहीच फरक पडत नाही. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विजय आमचाच आहे.”
