Trump Iran Peace Talks Update: Donald Trump hints at Pakistan-hosted negotiations to end the conflict with Iran : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेला संघर्ष कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध संपवण्यासाठी इराणसोबतची चर्चा पाकिस्तानात होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शरीफ यांची पोस्ट काय आहे?

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी पोस्ट केली की, “अमेरिका आणि इराण यांच्या सहमतीने, सध्या सुरू असलेल्या संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण आणि निर्णायक अशा चर्चेचे यजमानपद भूषवण्यास पाकिस्तान तयार आहे,”

ट्रम्प यांनी शरीफ यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट एका तासाच्या आत त्यांच्या ट्रूथ सोशल अकाउंटवरून पोस्ट केला आहे. यामुळे अमेरिकेने आधीच युद्ध जिंकल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून वारंवार करण्यात आला आहे, मात्र या पोस्टमुळे त्यांच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तान हा अशा प्रकारच्या वाटाघाटीसाठी यजमान देश म्हणून पाकिस्तानचे नाव यापूर्वीच समोर आले होते.

दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या दाराने आधीच चर्चा सुरू असल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याची खिल्ली उडवली होती. मात्र त्यानंतर इराणने त्यांना काही मित्र राष्ट्रांकडून युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने चर्चेची विनंती केल्याचे संदेश मिळाल्याचे मान्य करण्यात आले होते. सरकारी माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले होते.

मात्र अशी चर्चा झाली तर इराणचे प्रतिनिधित्व कोण करणार याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ हे इराणचे प्रतिनिधीत्व करू शकतात अशी चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे Axios या अमेरिकन मीडिया आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या बाजूने ट्रम्प यांचे सहकारी स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जारेड कुशनर हे याच आठवड्यात पाकिस्तानात इराणच्या शिष्टमंडळाशी चर्चेसाठी भेटू शकतात.

तसेच उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील या चर्चेत सहभागी होऊ शकतात असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या वाटाघाटींचे ठिकाण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असू शकते.