Trump Iran Strike Cancelled : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास रद्द केला आहे. इराण आणि इतर मध्यपूर्वेतील देशांनी केलेल्या विशेष विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. ट्रूथ या सोशल मीडियावरून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

अमेरिकेने इराणविरुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी लष्करी तयारी केली होती. मात्र, इराणसोबत एका कराराची प्राथमिक रूपरेषा ठरल्यामुळे हा हल्ला रोखण्यात आला आहे. या नव्या करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी त्वरित आणि पूर्णपणे खुली करणे, तसंच इराणचा आण्विक धोका संपवणे या प्रमुख अटींचा समावेश आहे.

अमेरिका इराणविरुद्ध अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली कारवाईसाठी सज्ज होती. इराण आणि मध्यराष्‍ट्रीय देशांच्या विनंतीवरून जागतिक शांततेसाठी आणि इराणच्या अस्तित्वासाठी हल्ला रद्द करण्यात आला. या शांतता प्रक्रियेत आणि कराराच्या बांधिलकीत इस्रायल देशही अमेरिकेसोबत आहे. हा करार जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश ट्रम्प यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

“जगाच्या भविष्यातील फायद्यासाठी आणि त्याचप्रमाणे एका यशस्वी व समृद्ध इराणच्या अस्तित्वासाठी, मी हा हल्ला रद्द करण्यास सहमती दर्शविली आहे; मात्र ुलम हाचत हे वेगाने करार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. इस्रायल देशही माझ्या या वचनबद्धतेत सामील आहे. प्रत्येकाने कामाला लागा आणि हे पूर्ण करा,” असे त्यांनी पुढे जोडले.

इराणची प्रतिक्रिया काय?

इस्त्रायलने या मुद्द्यावर त्वरित कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेने इराणच्या ठिकाणांवर नवीन हल्ले करण्याच्या ट्रम्प यांच्या धमक्यांची अंमलबजावणी केल्यास, त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा तेहरानने दिला होता. कुवेतच्या लष्कराने इराणकडून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर डागलेले शत्रूचे ड्रोन नष्ट केल्याचं सांगितल्यानंतर अवघ्या काही तासांतच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी तुर्की, पाकिस्तान आणि सौदीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर वेगवेगळ्या चर्चा केल्या.

अराघची यांच्या टेलिग्राम खात्यानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, इराण कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देईल. तसेच त्यांनी अमेरिकेच्या अस्थिर करणाऱ्या कारवायांचे परिणाम आणि प्रादेशिक असुरक्षितता वाढण्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. या सर्वोच्च इराणी राजनैतिक अधिकाऱ्याने नंतर आपले सौदी समकक्ष प्रिन्स फैसल बिन फरहान यांना सांगितले की, अमेरिका आणि इस्त्रायलचा कोणताही हल्ला किंवा अशा कारवायांमध्ये प्रादेशिक देशांचा सहभाग असल्यास त्याला प्रमाणशीर प्रत्युत्तर, दिलं जाईल.

सगळं जळून खाक होईल

अमेरिकन न्यूज आउटलेट ‘एक्सिओस’ने (Axios) उद्धृत केलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी शनिवारी ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि इराणबाबतच्या अमेरिकेच्या योजनांबद्दल चिंता व्यक्त करत स्पष्टीकरण मागितलं. इराणच्या सर्वोच्च सुरक्षा संस्थेशी संलग्न असलेल्या नूरन्यूज या वृत्तसंस्थेने शनिवारी सांगितलं की, अमेरिकेने इराणमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केल्यास इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील तेल क्षेत्रांवर, तसेच कतार आणि इस्त्रायलच्या गॅस क्षेत्रांवर हल्ले करेल आणि सगळं काही जळून खाक होईल.”