US Ground operation in Iran: इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराणच्या जमिनीवर उतरवून युद्ध करण्यासाठी सज्ज आहे. इराण देखील अमेरिकी सैनिकांचा समोरासमोर सामाना करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका इराणमधून शेकडो किलो संवर्धित युरेनियम ताब्यात घेण्याची धाडसी योजना तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
इराणमध्ये भू-लष्करी कारवाई करणार?
सरकारकडून या कारवाईला मान्यता मिळाल्यास अेमेरिका इराणमधून मारे १००० पाउंड (४५३.५ किलो) संवर्धित युरेनियम ताब्यात घेण्यासाठी सैन्य कारवाई करण्याचा विचार करत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या कारवाई बाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही पण, ट्रम्प यांनी सर्व पर्याय खुले ठेवल्याचे वृत्तात म्हटले आहे. इराणची अण्वस्त्र निर्माण करण्याची क्षमता उद्धवस्त करण्याचा ट्रम्प यांचा मनसुबा आहे. यामुळे या कारवाईच्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या कारवाईसाठी अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये उतरल्यास त्यांच्या सुरक्षेवर धोका राहणार आहे.
चर्चेतून तोडगा काढण्यावर भर
इराणने युरेनियमचे संवर्धन बंद करावे आणि याच्याशी निगडीत सर्व गोष्टींचा सोडून द्याव्यात अशी मागणी अमेरिकेने केली आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार याबाबत सध्या चर्चा देखील सुरु आहे. पण, चर्चा निष्फळ ठरल्यास अमेरिका युरेनियम हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. इराणने आडमुठी भूमिका न घेण्याचा इशारा ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. शांतता चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त मध्यस्थी करत असताना देखील दोन्ही देशांमध्ये अद्याप तोडगा निघाला नाही.
४०० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम
इराणकडे ४०० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम असल्याचा दावा केला जात आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिका आणि इस्रायलने याच कारणातून इराणवर हल्ला केला होता. राफेल ग्रोसी यांच्या मते, हा साठा त्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केलेल्या इस्फहानमधील एक भूमिगत बोगदा आणि नतान्झ या दोन प्रमुख ठिकाणी केंद्रित असण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास आणखी गुप्त ठिकाणे तयार करण्याची क्षमता इराणकडे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तर युद्ध अधिक तीव्र होणार
अमेरिका असो किंवा इस्रायल दोन्ही देशांसाठी इराणकडून युरेनियम ताब्यात घेणे अत्यंत धाडसी आणि तेवढेच धोकादायक ठरणार आहे. सैन्य जिमिनीवर उतरल्यास समोरुन होणारे हल्ले, माईन्स, ट्रॅप्स यांचा मोठा धोका असणार आहे. इराणने ४० ते ५० सिलिंडरमध्ये युरेनियम साठवूण ठेवल्याची माहिती आहे. अमेरिकेने या धाडसी कारवाईचा निर्णय घेतल्यास युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
