Donald Trump Iran War latest updates and Strait of Hormuz blockade situation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच ट्रम्प यांनी इराणला दिलेला १० दिवसांचा अल्टिमेटम संपत असतानाच, ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेची (ईस्टर्न टाइम) ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे. यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष हे इराणकडे लागले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी इराण होर्मुझची सामुद्रधुनी उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

दुसरीकडे इराणने युद्धात माघार घेण्यास नकार दिला असून तात्पुरत्या स्वरूपातील युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला आहे. जर इराणने होर्मुझमधून होणारी जहाजांची वाहतूक पूर्ववत केली नाही तर आपण त्यांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तरीही इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गाने जगतिक तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा जातो. मात्र मध्यपूर्वेत सुरू झालेल्या संघर्षामुळे या मार्गात मोठे अडथळे आले आहेत, ज्यामुळे इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.

युद्ध आणखी भडकणार?

अमेरिका-इराण युद्धात पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांमध्ये इराण, इस्रायल, लेबनॉन आणि या संपूर्ण प्रदेशात आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे

ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या मुदतीच्या आधी त्यांनी अटी मान्य केल्या नाहीत तर तिथले पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही तर संभाव्य युद्ध गुन्ह्यांबाबत आपण काळजी करत नसल्याचे सांगून ट्रम्प यांनी इराणविरोधातील आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. या दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरेल असा इशारा ट्रम्प यांना दिला आहे.

ट्रम्प यांची इराणला धमकी

इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली न केल्यास तसेच मंगळवारपर्यंत युद्धविराम करारावर चर्चा न केल्यास, इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला अण्वस्त्रे सोडून देण्यास आणि तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “संपूर्ण देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र मंगळवारची असू शकते. मला आशा आहे की मला असे पाऊल उचलावे लागणार नाही.” पत्रकारांनी विचारले की इराणच्या नागरी वीज प्रकल्पांवर हल्ला करणे हा ‘युद्ध गुन्ह्या’चा भाग ठरेल का, तेव्हा ट्रम्प यांनी तो दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “मला त्याची काळजी नाही. तुम्हाला माहित आहे युद्ध गुन्हा काय असतो? अण्वस्त्र बाळगणे हा युद्ध गुन्हा आहे.”

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारचा दिवस इराणमध्ये “पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे” (वीज प्रकल्प आणि पुलांचा दिवस) म्हणून ओळखला जाईल.

होर्मुझची सामुद्रधुनी कशी खुली होणार?

तज्ज्ञांच्या मते जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासाठी तीन मार्ग वापरले जाऊ शकतात.

१) इराणसोबत युद्धविराम करार

    सर्वात तातडीने केला जाऊ शकतो असा उपाय म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी युद्धविराम करार करणे.

    या परिस्थितीत व्यापक वाटाघाटी सुरू असताना इराण तात्पुरत्या किंवा काही अटींच्या अंतर्गत ही सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास मान्यता देऊ शकतो. मात्र असे झाल्यास या जलमार्गावर इराणचे पूर्णपणे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

    तज्ञांनी इशारा दिला आहे की, इराण या मार्गाने जाणाऱ्या जहाजांवर अनौपचारिक टोल किंवा निर्बंध लादू शकतो. त्यामुळे युद्ध संपले तरी होर्मुझची सामुद्रधुनी ही एक’नियंत्रित चोकपॉईंट’ बनेल. जर इराणकडून तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर टोल लावण्यात आला, तर जगभरात तेलाच्या किमती वाढू शकतात.

    हा पर्याय पूर्णपणे इराण लष्करी आणि आर्थिक दबावाखाली तडजोड करण्यास तयार आहे का यावर अवलंबून आहे. इराणने यापूर्वी आर्थिक निर्बंध किंवा लष्करी बळाच्या वापराला दाद दिलेली नाही. इराणकडून अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला तीव्र विरोध करण्यात आला आहे.

    २) अमेरिकेच्या नेतृत्वात लष्करी हस्तक्षेप

    होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आक्रमक भूमिका घेण्याचा आहे. ज्यामध्ये सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी अमेरिकेने थेट लष्करी कारवाई करणे, याचा विचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारची कारवाई केल्यास काही गोष्टी लक्षात घेणे आवश्य ठरेल.

    • सुरुंग (mines) हटवण्यासाठी नौदल तैनात करणे.
    • तेलाच्या टँकर्सना या जलमार्गातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी लष्करी संरक्षण देणे.
    • इराणचे सामरिक असेट्सचा ताबा घेण्यासाठी विस्तृत मोहिम राबवणे

    अमेरिकेने या प्रदेशात आधीच हजारोंच्या संख्येने सैन्य तैनात केले आहे, तरीदेखील लष्करी हस्तक्षेप करण्याचे अनेक धोके आहेत. असे केल्याने व्यापक प्रादेशिक युद्ध आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मित्र देशांच्या भक्कम पाठिंबा मिळत नाही, तोपर्यंत अमेरिका अशी कारवाई करण्याचा धोका पत्कारताना दिसत नाही आणि अशा स्वरूपाचा पाठिंबा इतर युरोपीय देश देतील याची शक्यता सध्या कमी दिसत आहे.

    ३) संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक स्तरावरील प्रयत्न

    होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तिसरा उपाय हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नेतृत्वाखाली राजनैतिक मार्गाने आणि एकत्रितपणे सुरक्षेसंबंधी तोडगा काढणे हा असू शकतो.

    संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आखाती देशांमधील सागरी सुरक्षेबाबत आधीच एक ठराव मंजूर केला आहे. भविष्यात होर्मुझची सामुद्रधुनीती सुरक्षा आणि यामुधून सुरक्षितपणे जहजांची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अनेक देशांची मिळून एक नौदलाची युती स्थापन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

    युके, ऑस्ट्रेलिया आणि कदाचित आशियामधील देश देखील यासाठी आपले सैन्य तैनात करू शकतात. पण हे सर्व जेव्हा सध्याचे युद्ध थांबेल तेव्हाच होणे शक्य आहे. जर अमेरिकेने संघर्षाची सोडवणूक न करताचा माघार घेतली तरच या पर्यायाचा विचार केला जाईल, आणि जागतिक महाशक्ती असलेले इतर देश यामध्ये हस्तक्षेप करतील.

    होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली तर काय?

    तज्ज्ञांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली तरीही युद्धाच्या आधीची परिस्थिती पुन्हा स्थापन होण्याची शक्यता कमी आहे. इराणचे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर भौगोलिक वर्चस्व कायम राहिले तर जागतिक ऊर्जा प्रवाहावर इराणचे नियंत्रण कायम राहिल. त्यामुळे इराण जगाची ऊर्जा साखळी कोणत्याही क्षणी विस्कळीत करू शकतो.