Minab School Airstrike Iran: इराणमध्ये मिनाब येथील मुलींच्या शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात १५० हून अधिक शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. यात शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी देखील मरण पावले. जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मुलींना दफन करण्यासाठी एकाचजागी खोदण्यात आलेल्या अनेक खड्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, आता या हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व शाळकरी मुलींचे फोटो इराणमधील एका वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापले आहेत.

तेहरान टाईम्सचा फोटो

इराणमधील प्रसिद्ध वृत्तपत्र तेहरान टाईम्सने मृत शाळकरी मुलींचे फोटो पहिल्या पानावर छापले आहेत. फोटोंच्यावर “ट्रम्प, यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा!” असा मथळा लिहला आहे. वृत्तपत्राचा हा फोटो आणि मथळा सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळेवरील हल्ल्यासाठी इराणलाच जबाबदार धरले होते. यावरुन ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका देखील या वृत्तपत्राच्या संपादकीय सदरातून करण्यात आली आहे.

हल्ल्याची जबाबदारी अमेरिका आणि इस्त्रायलने झटकली

मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्याची अमेरिका तसेच इस्त्रायलने देखील जबाबदारी झटकली आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या एका वृत्तात या हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार नसल्याचा निष्कर्ष काढला होता. याच आधारावर ट्रम्प यांनी हल्ल्यासाठी इराणलाच दोषी ठरवले होते. या हल्ल्यात १५० हून अधिक शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची इराणने म्हटले होते.

२८ फेब्रुवारीला हल्ला 

२८ फेब्रुवारीला मिनाब येथील लष्करी कम्पाऊंडवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी कम्पाऊंडला लागून असलेल्या शाळेला देखील लक्ष्य करण्यात आले होते. यात १६५ हून अधिक नागरिकांचा बळी गेला. यात १५० हून अधिक शाळकरी मुलींचा समावेश होता. या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.