इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेलं युद्ध थांबायचं नाव घेत नाही अशाच स्थितीत आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेणार नाही असं म्हटलं आहे. तसंच इस्रायलने आता पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली होती. होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यांनी आता यू टर्न घेतला आहे. कारण इस्रायलने इराणच्या पाईपलाईन्सवर हल्ला चढवला आहे.

इराणचा इस्रायलवर हल्ला, इस्रायलने गॅस पाईपलाईन्सवर केला हल्ला

इराणने मंगळवारी म्हणजेच २४ मार्चला इस्रायलवर हल्ला केला. ज्यानंतर इस्रायलने इराणच्या गॅस पाईपलाइन्सवर हल्ला केला. पाच दिवसांसाठी हल्ले थांबवण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अचानकच हे हल्ले झाले आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं होतं की इराणी अधिकाऱ्यांशी आमची चांगली चर्चा झाली आहे. आम्ही पुढचे पाच दिवस हल्ले करणार नाही. दरम्यान इराणकडून या वृत्ताला दुजोरा दिला गेला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प हे बातम्या पसरवत आहेत असं इराणने म्हटलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इराणवर पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.

संघर्ष तीव्र होण्याचीच चिन्हं

अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणला ४८ तासांची मुदत दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद करू, असा इशारा दिला होता. दरम्यान अमेरिकेने दिलेली मुदत मंगळवारी रात्री बारा वाजता संपणार होती. पण, सोमवारीच ट्रम्प यांनी मुदतीत पाच दिवसांची एकतर्फी वाढ केली तसंच हे हल्लेही झाले आहेत. त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र होतो आहे हे निश्चित मानलं जातं आहे.

लेबनॉनवर, इराणवर इस्रायलचे हल्ले

इस्रायलच्या विमानांनी दक्षिण लेबनॉनच्या अल रशीदिया या ठिकाणी असलेल्या अल अमाना गॅस केंद्रावर हवाई हल्ला केला.

मंगळवारी लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरुतवर हल्ला करण्यात आला. इस्रायच्या IDF ने हिजबुल्लाहच्या संशयित ठिकाणी एका पाठोपाठ एक हवाई हल्ले केले. त्याआधी इस्रायलने परिसर रिकामा करा असे इशारेही दिले होते. ज्यामुळे हजारो लोक आपला जीव वाचवत सुरक्षित ठिकाणी पळताना दिसले होते.

इराणच्या उर्जा प्रकल्पांवर सोमवार आणि मंगळवार अशा दोन्ही दिवशी हल्ला करण्यात आला. इराणमधल्या खुर्रमशहर आणि इस्फहानला लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे गॅस नेटवर्कला मोठं नुकसान झालं आहे. पाइपलाइन फुटल्याने खुर्रमशह पॉवर स्टेशनची वीज उत्पादन क्षमता ठप्प झाली आहे.