अमेरिका-इराणमध्ये युद्धाचा वणवा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर ८ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांत शांतता करारासाठी अनेकदा चर्चा देखील झाल्या. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. पण त्यानंतर अचानक शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर अमेरिका-इराणमधील संघर्षात पुन्हा वाढ झाली.
दोन दिवसांपूर्वी इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता अमेरिकेनेही इराणवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष आणखी वाढला असून आता अमेरिका आणि इराण यांच्यात नव्याने संघर्षाची ठिणगी पडली आहे. या घडामोडी दरम्यानच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. इराण युद्धावर तोडगा काढायचा की पुन्हा युद्ध? यावर ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात तब्बल ९० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या बैठकीत इराण युद्धाबाबत तीन पर्याय काढण्यात आल्याचंही बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
ट्रम्प अन् नेतान्याहू यांच्यात काय चर्चा झाली?
डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये या आठवड्यात बैठक झाली. या बैठकीबाबत इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही नेत्यांमध्ये ९० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत मुत्सद्देगिरी, आर्थिक दबाव आणि लष्करी बळ या सारख्या सर्व संभाव्य गोष्टींवर चर्चा झाली.
इराणबाबत तीन पर्यांवर चर्चा
‘ॲक्सिओस’च्या एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील चर्चेचा मुख्य विषय इराण युद्ध हाच होता. ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी इराणबाबत तीन पर्यांवर चर्चा केली.
पहिला पर्याय म्हणजे इराणबरोबर वाटाघाटींद्वारे करार करणं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.
दुसरा पर्याय म्हणजे इराणभोवती नौदलाची नाकेबंदी कायम ठेवणं आणि अतिरिक्त उपाययोजनांद्वारे आर्थिक दबाव आणखी वाढवणं.
तिसरा पर्याय म्हणजे शांतता राखण्यासाठी मुत्सद्देगिरी करणं आणि निर्बंध लादणं. मात्र, तरीही अपयश आल्यास लष्करी हल्ले पुन्हा सुरू करणं, या पर्याबाबत चर्चा झाली.
