Donald Trump confirms mutual decision with Netanyahu : २८ फेब्रुवारीपासून चालू झालेले इराणविरोधातील युद्ध संपण्याचे नाव घेत नाहीय. इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात भीषण युद्ध छेडलं असून याचा परिणाम जागतिक स्तरावर होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे हे युद्ध कसं आणि कधी संपणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. दरम्यान, याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
इराणविरोधातील युद्ध संपवण्याचा निर्णय इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. बिन्यामिन नेतान्याहू पंतप्रधान नसते तर इराणने इस्रायलचा नाश केला असता, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ते टाइम्स ऑफ इस्रायलशी बोलत होते.
निर्णय परस्पर संमतीने घेऊ
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, युद्ध थांबविण्याबाबत परस्पर संमतीने निर्णय घेतला जाईल. आम्ही याबाबत बोलत आहोत. योग्य वेळेत निर्णय घेतला जाईल. तसंच, सर्वकाही विचारत घेतलं जाईल, असंही ते म्हणाले. तसंच, अमेरिकेने इराणवरील हवाई हल्ले थांबवल्यानंतर इस्रायलही थांबवेल का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळलं.
विशेष म्हणजे, मध्य पूर्वेतील संघर्षाचा आजचा दहावा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरूच ठेवले. दरम्यान, अमेरिकन लष्करी तळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियासह आखाती राष्ट्रांना इराणनेही लक्ष्य केलं आहे. येथील इंधन साठ्यांवर हल्ले करून जागतिक कोंडी करण्याचा प्रयत्न इराणचा आहे. परिणामी जगातील इतर देश अमेरिका आणि इस्रायलला युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतील.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची देशाच्या सर्वोच्च नेते पदी नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे इराणी राज्य माध्यमांनी वरिष्ठ धर्मगुरुंचे निवेद प्रकाशित केले, यामध्ये मोजताबा यांच्या नियुक्तीबाबत सांगण्यात आले.
इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची निवड करणार्या धर्मगुरूंच्या मंडळातील वरिष्ठ सदस्याने सांगितले, की ‘अमेरिकेसारख्या सैतानानेही त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.’ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजताबा खामेनी यांच्याशिवाय इराणला दुसरा पर्याय नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे ही निवड केल्याचे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सूचित केल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप काही प्रक्रिया बाकी असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले.
