Joe Kent Resignation Trump Reaction: इराणविरुद्ध सुरु असलेल्या युद्धाला विरोध दर्शवत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी केंद्राचे (नॅशनल काउंटरटेररिझम सेंटर) संचालक जो केंट यांनी मंगळवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. केंट यांच्या राजीनाम्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जो केंटने राजीनामा देला ही चांगलीच गोष्ट आहे. सुरक्षेच्या बाबतीत तो अत्यंत कमकुवत होता”, असे ट्रम्प म्हणाले आहेत. इराणकडून अमेरिकेला कोणताही थेट धोका नाही पण, केवळ इस्रायलच्या दबावाखाली अमेरिकेने हे युद्ध सुरु केल्याचा गंभीर आरोप जो केंट यांनी केला आहे.
जो केंट यांच्या राजीनाम्याबाबत ट्रम्प काय म्हणाले?
“मला नेहमी वाटायचं की सुरक्षेच्या बाबतीत तो खूपच कमकुवत आहे. मी त्याला फारसा ओळखत नव्हतो. पण तो एक चांगला माणूस वाटतो. पण मी त्याचं निवेदन वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यानं राजीनामा दिला हे चांगलंच झालं, कारण इराणपासून कोणताही धोका नाही असे तो म्हणाला आहे. अशा लोकांची आम्हाला गरज नाही”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
केंट यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका
जो केंट यांनी आपल्या राजीनामापत्रात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अमेरिका हे युद्ध एका विशिष्ट अजेंड्यासाठी करत असल्याचा आरोप केंट यांनी केला. ट्रम्प यांनी २०१६ आणि २०२० मध्ये अमेरिका फर्स्ट धोरणाचा पुरस्कार केला पण, प्रशासन आता त्यापासून भरकटले आहे. इराणविरोधातील युद्धाचे समर्थन करण्याची माझी विवेकबुद्धी मला परवानगी देत नाही”, असे केंट यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
इस्रायलवर आरोप
इस्रायल आणि तेथील लॉबीच्या दबावामुळे अमेरिकाने युद्ध सुरु केल्याचा आरोप केंट यांनी केला आहे. इस्रायली अधिकारी आणि अमेरिकन मीडियाने दिशाभूल करुन इराणकडून धोका असल्याचे भासवले. इराक युद्धाच्या वेळी झाला तोच प्रकार इराणविरुद्धच्या युद्धात होत आहे. अमेरिकन जनतेची फसवणूक असल्याचा आरोप केंट यांनी केला.
कोण आहेत जो केंट?
जो केंट हे देखील एक निवृत्त लष्करी जवान असून, त्यांनी ११ वेळी युद्धभूमीवर देशासाठी सेवा बजावली आहे. त्यांच्या पत्नी शॅनन युद्धात शहीद झाल्या होत्या. अमेरिकेच्या पुढच्या पिढीला युद्धात ढकलण्याचे मी समर्थन करु शकत नाही, अशा शब्दात जो केंट यांनी नाराजी व्यक्त केली.
१८ दिवसांपासून संघर्ष
अमेरिका आणि इस्रायल यांच्यात २८ फेब्रुवारीला सुरु झालेल्या युद्धाला १८ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप देखील हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली, मोजतबा खामेनी देखील या हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप बंद असून, जगात तेल, गॅस तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे.
