पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्या ट्रम्प यांना बायडन यांचा टोला; म्हणाले…

निवडणूक जिंकल्यानंतर बायडन यांनी पहिल्यांदा ट्रम्प यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांनी विजय मिळवला. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झालेला असतानाही त्यांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही, यावर बायडन यांनी भाष्य केलं आहे. ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार देणं हे लाजिरवाणं असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परंपरेला नुकसान पोहोचवणारं आहे, असं बायडन यांनी म्हटलं आहे.

डेलावेयर येथे बोलताना बायडन म्हणाले, “मला वाटतं हे लाजिरवाणं आहे. राष्ट्राध्यक्षांच्या परंपरेला हे नुकसान पोहोचवणार असल्याचं मला स्पष्टपणे वाटतं. पण शेवटी २० जानेवारी रोजी सर्वकाही व्यवस्थित होईल. आशा की अमेरिकेच्या लोकांना हे कळालंय की परिवर्तन झालं आहे.”

आणखी वाचा- लशीची घोषणा निवडणुकीपूर्वी न केल्यानेच पराभव – ट्रम्प

ट्रम्प यांना मतदान करणाऱ्यांच्या भावना आपण जाणतो असं सांगताना बायडन म्हणाले, “यांपैकी अनेकांना देशाला एकत्र आणायचं होतं. त्यांना हे कळत असेल की आपल्याला एकत्र यावं लागेल. मला वाटतंय की ते एकजूट व्हायला तयार आहेत. याद्वारे आपण गेल्या चार-पाच वर्षात पाहिलेल्या देशातील या कडव्या राजकारणातून बाहेर काढू शकतो,” असंही बायडन म्हणाले.

आणखी वाचा- जाता जाता… ट्रम्प चालणार शेवटची चाल; चीन मुद्द्यावरुन बायडेन यांना आणणार अडचणीत

राष्ट्राध्यक्षांविरोधात कायदेशीर कारवाईबाबत विचारले असता बायडन म्हणाले, “मला कायदेशीर कारवाईची गरज नाही. कायदेशी कार्यवाही सुरुच आहे, जी आपण बाहेर पाहत आहात. आत्तापर्यंत डोनाल्ड ट्रम्प आणि माईक पोम्पिओ यांनी केलेल्या कुठल्याही दाव्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.” रिपब्लिक पार्टी आपला विजय स्विकारण्यास तयार नसल्याचं दिसत आहेत. यावर बायडन म्हणाले, ते लवकरच याचा स्वीकार करतील.

आणखी वाचा- “….तुमच्या वयाला शोभत नाही,” शरद पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला सल्ला

ट्रम्प अद्यापही पराभव मान्य करण्यास नकार तयार नाहीत. त्यांनी म्हटलंय की, निवडणूक अद्याप संपलेली नाही. ट्रम्प यांनी काही राज्यांमधील निकालांना आव्हान देण्यासाठी कोर्टामध्ये अनेक खटले दाखल केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trump refusal to concede defeat an embarrassment says jo biden aau

ताज्या बातम्या