Donald Trump rejects Iran’s latest proposal : पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने पाठवलेल्या ताज्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असमाधान व्यक्त केले आहे. यामुळे दीर्घकाळ चाललेला हा तिढा सुटण्याच्या आशांना पुन्हा एकदा खिळ बसली आहे. तेहरानने वाटाघाटीसाठी दिलेला नवीन प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावला असून इराण अशा काही सवलती मागत आहे ज्या स्वीकारणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या प्रस्तावावर मी समाधानी नाही

व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “त्यांना करार करायचा आहे, पण मी त्यांच्या प्रस्तावावर समाधानी नाही.” इराणचे नेतृत्व विखुरलेले असून ते दोन-तीन गटांत विभागले गेले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र विकसित करू दिले जाणार नाही, या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. युद्धाच्या पर्यायावर बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमच्यासमोर दोन पर्याय आहेत: एक तर त्यांच्यावर जोरदार हल्ला करून त्यांना कायमचे संपवून टाकणे किंवा दुसरा म्हणजे करारासाठी प्रयत्न करणे. मानवी दृष्टिकोनातून मला हल्ला करणे आवडणार नाही.”

इराणने अमेरिकेकडे युरेनियम संवर्धनाचा आपला अधिकार मान्य करण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली आहे. तेहरानच्या मते, हे संवर्धन केवळ शांततापूर्ण हेतूंसाठी केले जात आहे, परंतु पाश्चात्य देशांच्या मते याचा उद्देश अण्वस्त्रे बनवणे हा आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि फोनवरून वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. “त्यांनी प्रगती केली आहे, पण ते कधी ध्येयापर्यंत पोहोचतील याची मला खात्री नाही,” असे ट्रम्प म्हणाले. “ते अशा गोष्टी मागत आहेत ज्यांना मी सहमत होऊ शकत नाही”, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कौतुक करतानाच त्यांनी सध्या फोनवरून चर्चा सुरू असल्याचे सांगितले. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी सांगितले की, जर अमेरिकेने आपली धमकीवजा भाषा आणि चिथावणीखोर कृती थांबवली, तर इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार आहे. मात्र, कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचे सशस्त्र दल सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

युद्धाची पार्श्वभूमी आणि आर्थिक परिणाम

या संघर्षाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनी झाली. यामुळे जगातील २०% तेल आणि वायू पुरवठ्याचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद झाल्याने जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली होती. ८ एप्रिल रोजी युद्धविराम झाला असला तरी तणाव कायम आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेले आहेत. सध्या अमेरिकन नौदलाकडून इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध आणले जात आहेत, तर इराणनेही कोणत्याही संभाव्य हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे.