वृत्तसंस्था, दुबई, वॉशिंग्टन

अमेरिका-इराणमध्ये समेट होण्याची शक्यता पुन्हा लांबणीवर पडली असून, इराणने अमेरिकेच्या शांतता प्रस्तावाला दिलेले उत्तर अजिबात स्वीकारता येणार नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेनंतर तेलाच्या दारमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अद्याप बंदच आहे.

अमेरिकेने युद्ध संपण्यासाठी ठेवलेल्या प्रस्तावाला इराणने रविवारी उत्तर दिले. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध तत्काळ संपविण्याचा प्रस्ताव इराणने ठेवला. इराणच्या प्रस्तावात युद्धामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी नुकसानभरपाईचा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच, अमेरिकेने केलेली नौदल नाकेबंदी उठवावी, पुन्हा हल्ले न करण्याची हमी द्यावी, इराणवरील निर्बंध उठवावेत आणि तेलविक्रीला मुभा द्यावी या मुद्द्यांचाही समावेश होता.

इराणने पाठविलेला प्रस्ताव ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांत धुडकावून लावला. इराणचा प्रस्ताव अजिबात मान्य नसल्याने तो स्वीकारता येणार नसल्याची टिप्पणी त्यांनी समाजमाध्यमांवर केली. अमेरिकेने युद्ध तत्काळ संपवून इराणच्या अणुकार्यक्रमासह इतर मुद्द्यांवर नंतर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

इराणने आपल्या उत्तराचे सोमवारी समर्थन केले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले, की आम्ही जबाबदारीने केलेल्या मागण्या रास्त आहेत.

‘सन्मानाने चर्चेस तयार’

तेहरान : ‘‘इराण चर्चेसाठी तयार असून, ती इराणची प्रतिष्ठा राखून व्हायला हवी,’’ असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे. फराज पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केले. इराणमधील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करायला हवी, यावर त्यांनी जोर दिला.

इराणसमोर नजीकच्या भविष्यात अनेक पर्याय आहेत. प्रतिष्ठेसह चर्चेला सामोरे जाण्याचा पर्याय आहे. असे झाले नाही, तर युद्ध किंवा शांतता नसलेल्या काळाचा सामना करावा लागेल किंवा युद्धाच्या दिशेने जावे लागेल. इराणने रास्त अशा मागण्याच अमेरिकेकडे केल्या आहेत. – मसूद पेझेश्कियान

‘ब्रिक्स’ परिषदेनिमित्त अराघची भारतात येणार?

तेहरान: इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात येण्याची शक्यता आहे. ब्रिक्स संघटनेच्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक १४ आणि १५ मे रोजी होणार आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होणार आहे. ब्रिक्स संघटनेमध्ये २०२४ मध्ये इराण सहभागी झाला आहे. इराणबरोबरच इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती हे देशदेखील ब्रिक्स संघटनेचे सदस्य झाले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह हेदेखील भारतात येणार आहेत.

संघर्षाच्या झळा

– अमेरिका-इराणमध्ये समेट होण्याची चिन्हे न दिसल्याने सोमवारी तेलाच्या किमतींमध्ये प्रतिबॅरल चार डॉलरने वाढ झाली.

– अमेरिकेमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, गॅसोलिनच्या वाढत्या किमतींमुळे इराणमधील युद्धाबाबत अमेरिकेत नकारात्मक वातावरण आहे.

– तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान मंगळवारी कतारला भेट देणार आहेत. ते अमेरिका, इराण आणि पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेवर त्यांच्यात चर्चा होईल.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प बुधवारी चीनमध्ये

पीटीआय, बीजिंग

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ ते १५ मे दरम्यान चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या दौऱ्याची घोषणा केली. गेल्या नऊ वर्षांत प्रथमच अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा होणार आहे. यापूर्वी २०१७मध्ये अध्यक्ष ट्रम्प त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात चीनच्या दौऱ्यावर आले होते.

पश्चिम आशियातील लांबलेले युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील तिढा, जागतिक ऊर्जासंकट, अमेरिका आणि चीनमधील तैवानसह इतर मुद्द्यांवरून वाढते तणाव या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे.

अमेरिकेच्या उपमुख्य माध्यम सचिव ॲना केली यांनी सांगितले, की ट्रम्प यांचे बीजिंगमध्ये बुधवारी सायंकाळी आगमन होईल. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर गुरुवारी त्यांची चर्चा होईल. बीजिंगमधील ‘टेम्पल ऑफ हेवन’ला नंतर ते भेट देतील. दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी पुन्हा चर्चा होईल. त्यानंतर चहापान आणि भोजनाचा कार्यक्रम होईल. अमेरिकाही चीनच्या अध्यक्षांना या वर्षामध्ये येण्याचे आमंत्रण देणार आहे.

अमेरिका-चीनमध्ये व्यापार कराराची शक्यता

चीनचे उपाध्यक्ष ही लाइफेंग १२ आणि १३ मे रोजी दक्षिण कोरियाचा दौरा करणार असून, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्याशी व्यापाराबद्दल ते बोलणी करतील. त्यांच्यातील चर्चेची ही अखेरची फेरी असेल. ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता आहे.