डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी ‘एआय’चं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बैठकीदरम्यान, व्हाईट हाऊसने जारी केलेल्या एका अधिकृत कागदपत्रात चक्क स्पेलिंगची मोठी चूक समोर आली आहे. या कागदपत्रात ‘United States’ (युनायटेड स्टेट्स) ऐवजी चुकीने ‘Unites States’ (युनाइट्स स्टेट्स) असा शब्द छापला गेला आहे.
ट्रम्प सध्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ऐवजी ‘सुपर इंटेलिजन्स’ किंवा SI हा शब्द वापरण्यावर भर देत आहेत. याच बैठकीशी निगडीत कागदपत्रावर ही चूक झाली होती. या प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकृत कागदपत्रावरील या चुकीवर अनेक युझर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून टीका केली आणि ट्रम्प प्रशासनाची खिल्ली उडवली.
‘युनाइट्स स्टेट्स’चे अध्यक्ष…अरे थांबा, समजलं का… ते आपल्याला एकत्र आणणार आहेत. तुमच्या मागे अकार्यक्षम माणसं बसली असतील, तर ‘सुपर इंटेलिजन्स’चा काहीही उपयोग होत नाही, अशी टीका एका युझरने केली.
“ट्रम्प आता देशाचे नाव बदलून ‘युनाइट्स स्टेट्स’ करण्याचा नवा आदेशच जारी करतील,” असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे.
तसेच, आणखी एकाने, “यातला ‘S’ हा ‘सुपर इंटेलिजन्स’साठीच वापरला आहे,” असे मिश्किलपणे प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या दिग्गजांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत एलॉन मस्क, मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग, Google चे सीईओ सुंदर पिचाई आणि एनव्हीडियाचे सीईओ जेन्सन हँग सहभागी झाले होते. या बैठकीनंतर लगेचच हा प्रकार समोर आला.
अमेरिका आता सरकारी कागदपत्रांमध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ऐवजी अधिकृतपणे ‘सुपर इंटेलिजन्स’ हाच शब्द वापरेल. हे तंत्रज्ञान अजिबात ‘कृत्रिम’ नसल्यामुळे हा शब्द योग्य नाही, असे ट्रम्प बैठकीदरम्यान म्हणाले. ट्रम्प प्रशासनाने सर्व सरकारी संस्थांना अधिकृत कागदपत्रांमध्ये ‘सुपर इंटेलिजन्स’ आणि ‘SI’ हेच शब्द वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
