Trump reveals Iran secret gift: ‘इराणबरोबर सकारात्मक वाटाघाटी सुरु आहे. इराणने अमेरिकेला खूप मोठी मौल्यवान भेट दिली आहे’, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पण, ही मौल्यवान भेट कोणती? याबाबत त्यांनी खुलासा न करता सस्पेन्स कायम ठेवला होता. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प यांनी इराणकडून मिळालेल्या गुढ भेटवस्तूची अखेर माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर वाटाघाटी सकारात्मक पद्धतीने सुरु असल्याचा हा संकेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय आहे मौल्यवान भेटवस्तू?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “इराणकडून मिळालेली मौल्यवान भेटवस्तू म्हणजे तेलाचे दहा जहाज आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून दहा जहाजांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास इराणने परवानगी दिली”. यापैकी काही पाकिस्तानी नौका असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. “सुरुवातीला त्यांनी (इराण) आठ जहाज सोडण्याचे आश्वासन दिले मात्र, त्यानंतर आणखी दोन जहाजांना सोडण्यात आले”, असे ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले.
माफी म्हणून आणखी दोन नौका
इराणने मागून सोडलेल्या दोन अतिरिक्त नौका म्हणजे त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मागितलेली माफी होती, असाही दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान, यापूर्वी इराणकडून खूप मोठी आणि मौल्यवान भेट मिळाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. अतिशय महागडी भेट असल्याचेही त्यांनी वारंवार नमूद केले होते. त्यावेळी त्यांनी याची माहिती देण्यास नकार दिला होता. पण, ही मौल्यवान भेट म्हणजे दहा तेलाचे जहाज असल्याचे त्यांनी आता सांगितले आहे.
होर्मुझचा मुद्दा
इराणने संघर्ष सुरु झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली असून, ठराविक जहाजांना जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, मित्रराष्ट्र वगळता शत्रूराष्ट्र (अमेरिका- इस्रायल) आणि त्यांना मदत करणाऱ्या राष्ट्रांच्या जहाजांना येथून जाण्यास परवानगी दिली जात नाहीये. त्यामुळे असंख्य जहाज होर्मुझमध्ये अडकून पडले आहेत. इराण होर्मुझमधून जाण्यासाठी शुल्क आकारणी करण्याच्या तयारीत आहे. याबाबत विचारले असता ते असं करु शकणार नाहीत, असे ट्रम्प म्हणाले.
शांतता प्रस्ताव आणि चर्चा
इराण आणि अमेरिकेच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सध्या पाकिस्तान मध्यस्थी करत आहेत. अमेरिकेने इराणसमोर १५ प्रस्ताव मांडले असून, त्याला इराणने स्पष्ट नकार कळवला आहे. अशात इराणने नव्याने पाच अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. दोन्ही देशातील संघर्ष मिटविण्यासाठी पाकिस्तान कसे प्रयत्न करणार? याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. सध्या शांतात प्रस्तावावर वाटाघाटी सुरु असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
