अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजकीय प्रतिदंद्वी आहेत. असं असलं तरी आता वाकयुद्ध कुस्तीच्या आखाड्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. एका पत्रकार परिषदेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कुस्तीच्या आखाड्यात आले तर काय होईल? याबाबत सांगितलं आहे. ट्रम्प यांनी इव्हँडर होलीफिल्ड आणि व्हिटर बेलफोर्ट यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या सामन्याचं समालोचन डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड ज्यूनिअर पण असणार आहे.

ड़ोनाल्ड ट्रम्प हे ७५ वर्षांचे असून बायडेन त्यांच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. यावेळी पत्रकारांनी हा संदर्भ पकडत ट्रम्प यांना प्रश्न विचारला. बॉक्सिंगसाठी तुम्ही कोणाची निवड कराल?. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. “माझी बॉक्सिंग रिंगमध्ये जर जो बायडेन यांच्य़ाशी लढत झाली तर मी काही सेकंदातच त्यांना बाद करेन.”, असं विधान माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलं. यावेळी त्यांनी जो बायडेन यांच्या जुन्या विधानाची आठवण देखील करून दिली. “त्याने एकदा सांगितलं होतं की मला व्यायामशाळेच्या मागे घ्यायला आवडेल. पण त्याने तसं केलं तर ते संकटात सापडतील. काही सेकंदात खाली पडतील”, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं.

पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या विधाननंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत केले आहे. या निवडणुकी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांची खाती बंद केली आहेत.