Trump Birthright Citizenship Row: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध (बर्थराईट) नागरिकत्वावरुन भारत आणि चीनबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. ट्रम्प यांनी यासंबधित एक व्हिडीओ ‘ट्रुथ सोशल’वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने, “मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावे यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात”, असा दावा केला आहे. या व्हिडीओत त्याने भारत आणि चीन यांचा उल्लेख ‘नरक’ असा केला आहे.
सॅव्हेजचा व्हिडीओ काय?
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, “इथे जन्मल्यानंतर मुलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि नंतर ते चीन, भारत किंवा जगातील इतर कोणत्याही नरक (हेलहोल) जागेतून आपल्या संपूर्ण कुटुंबाला अमेरिकेत घेऊन येतात,” मायकल सॅव्हेज या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर करून एकप्रकारे या विचारांचे समर्थन केले आहे. “तुम्हाला हे अनुभवण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. इथं इंग्रजी आता बोललं जात नाही. ते (स्थलांतरीत) या देशाप्रती इमानदार नाहीत”, असे सॅव्हेज पुढे म्हणतो.
नोकरीचा मुद्दा
याच व्हिडीओत अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरभरतीवर भारतीय आणि चिनी लोकांचे वर्चस्व आहे, असा दावा करण्यात आला आहे. “गोऱ्या लोकांना नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज नाही, कारण सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांकडून चालवल्या जातात”, असे या व्हिडिओत म्हटले आहे. भारतीयांचा मी समर्थक होतो पण इथं जे सुरु आहे ते पाहून माझे डोळे उघडले असे सॅव्हेज या व्हिडीओत म्हणत आहे. ट्रम्प यांनी या शोची स्क्रिप्ट देखील शेअर केली आहे.
कायदा रद्द करण्याची मागणी
अमेरिकेच्या १४ व्या घटनादुरुस्तीनुसार, अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कोणालाही आपोआप नागरिकत्व मिळते. ट्रम्प यांनी अनेकदा ही तरतूद रद्द करण्याची किंवा मर्यादित करण्याची मागणी केली आहे. सध्या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर सुनावणी सुरू असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. मायकल सॅव्हेजने देखील त्याच्या शोमध्ये या कायद्याला समर्थन देणाऱ्यांचा निषेध करत कठोर शब्दात टीका केला.
भारतीय समुदायात चिंता
ट्रम्प यांनी एकेकाळी भारतीयांचे मोठे समर्थक असल्याचे म्हटले होते, मात्र आताच्या त्यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना या विधानामुळे लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
