Investigation into Trump shooter : व्हाइट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये शनिवारी रात्री गोळीबार झाला. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्ससहीत अनेक वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. तसंच अनेक पत्रकार, सेलिब्रिटी वगैरेही या कार्यक्रमात होते. कार्यक्रमस्थळी डोनाल्ड ट्रम्प उपस्थितांना संबोधित करणार होते, तेवढ्यातच हॉलबाहेर एका शस्त्रधारी हल्लखोराने गोळीबार सुरू केला. दरम्यान या हल्लेखोराने त्याच्या नातेवाईकांना कथितपणे ‘अँटी-ट्रम्प मॅनिफेस्टो’ (ट्रम्प विरोधी जाहीरनामा) पाठवला होता. त्यात, “बाललैंगिक अत्याचार करणारा (paedophile), बलात्कारी आणि देशद्रोही” अशा शब्दांचा वापर केला होता. न्यू यॉर्क पोस्टने या जाहीरनाम्याविषयी वृत्त दिलं आहे.

मी अमेरिकेचा नागरिक…

या गोळीबारादरम्यान सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता दाखवून हल्लेखोराला ताब्यात घेतले. कोल ॲलन असं त्याचं नाव असून तो ३१ वर्षीय असल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान, त्याने त्याच्या कुटुंबियांना पाठवलेल्या जाहीनाम्याचीही चर्चा होत आहे. संशयित आरोपी कोल ॲलन याने या जाहिरनाम्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा ट्रम्प यांचे नाव न घेता लिहिले होते की, “मी अमेरिकेचा नागरिक आहे. माझे प्रतिनिधी जे काही करतात त्याचा परिणाम माझ्यावर होतो. आणि मी यापुढे एका बाललैंगिक शोषक, बलात्कारी आणि देशद्रोही व्यक्तीला त्याच्या गुन्ह्यांचे डाग माझ्या हातावर लावू देणार नाही.”

‘न्यू यॉर्क पोस्ट’ला मिळालेल्या दस्तऐवजानुसार , ॲलनचे लक्ष्य सर्वोच्च पदापासून ते सर्वात खालच्या पदापर्यंत प्राधान्यक्रमाने प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यातून एफबीआय संचालक काश पटेल यांना स्पष्टपणे वगळण्यात आले होते. गरज असल्याशिवाय कायदा अंमलबजावणी करणारे आणि हॉटेल सुरक्षा कर्मचारी लक्ष्य नसावेत, असे त्या हल्लेखोराने कथितरित्या लिहिले होते, तर पाहुणे आणि कर्मचारी लक्ष्य नव्हते. पण त्याने पुढे असेही लिहिले की, “जर अत्यंत गरज पडली, तर लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी इथल्या बहुतेक सर्वांना पार करीन”.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय?

न्यू यॉर्क पोस्टने प्रकाशित केलेल्या कथित जाहीरनाम्याच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही . व्हाईट हाऊस आणि न्याय विभागाने प्रतिक्रियेच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. पण रविवारी ‘६० मिनिट्स ‘ या कार्यक्रमात ट्रम्प यांनी त्या दस्तऐवजाची सत्यता मान्य केली.

‘सीबीएस’च्या ‘६० मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्वतःवरील लैंगिक हिंसेचे आरोप फेटाळून लावत या जाहीरनाम्याला “कट्टरपंथी” (radicalized) म्हटले. जेव्हा मुलाखतकाराने विचारले की, संशयिताचा रोख तुमच्याकडेच होता असे तुम्हाला वाटते का? त्यावर ट्रम्प म्हणाले, “मी बाललैंगिक अत्याचार करणारा नाही. मला माफ करा, पण मी तसा नाही. तुम्ही त्या एका आजारी माणसाने लिहिलेले घाणेरडे विचार वाचताय? माझं नाव अशा गोष्टींशी जोडलं गेलं ज्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी यातून पूर्णपणे निर्दोष मुक्त झालो आहे.”